लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : मागील पाच वर्षापासून माेहफुलाची दारू काढणे, विक्री करणे यासह अन्य असामाजिक कृत्य करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराविरुद्ध रामटेक पाेलिसांनी जिल्हा दंडाधिकारी विमला आर यांच्या आदेशान्वये एमपीडीए (महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धाेकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा कायदा) कारवाई करण्यात आली. त्या गुन्हेगाराला एक वर्षासाठी नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिली.
संजय हरिदास धुर्वे (२९, रा. काचूरवाही, ता. रामटेक) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. संजय २०१७ पासून सतत माेहफुलाची दारू काढणे व ती दारू रामटेक तालुक्यातील काचूरवाही, खोडगाव, किरणापूर, चोखाळा, मसला, खंडाळा, हातोडी या गावांमध्ये अवैध विक्री करायचा. पाेलिसांनी अनेकदा त्याच्या भट्टी व अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाडी टाकून त्याला अटक केली व गुन्हे नाेंदविले. मध्यंतरी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली हाेती.
त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने रामटेकचे ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी त्याच्याविराेधात एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यामार्फत जिल्हादंडाधिकारी विमला आर यांच्याकडे पाठविला हाेता. जिल्हा दंडाधिकारी विमला आर यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिल्याने, रामटेक पाेलिसांनी शुक्रवारी (दि. ३) संजयला अटक केली व त्याची थेट नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगात रवानगी केली.
...
समाजविघातक कृत्यांमध्ये वाढ
अवैध दारूविक्रीमुळे काचूरवाही व परिसरातील गावांमधील तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून महिला व तरुणींची छेड काढणे, विनयभंग करणे, घरातील महिलांना मारहाण करणे, दारू प्यायल्यानंतर अनियंत्रित वेगात वाहने चालविणे, ग्रामपंचायत पदाधिकारी व दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांवर हल्ले करणे, यासह अन्य समाजविघातक कृत्यांमध्ये वाढ झाली हाेती. या कारवाईमुळे स्थानिक महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.