नागपूर : कुठे रेल्वेलाईनचा विस्तार व्हावा तर कुठे अंडरपासचे काम व्हावे. कुठे नवीन रेल्वेगाडी सुरू करावी तर कुठे रेल्वेस्थानकाचा पुुनर्विकास करावा, अशा विविध मागण्या नोंदवत वेगवेगळ्या विकास कामांचे प्रस्ताव खासदारांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसमोर मांडले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी आज नागपूर येथे दाैऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत नागपूर आणि भुसावळ रेल्वे विभागातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अमरावतीचे खासदार अनिल एस. बोंडे, नाशिकचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे, धुळ्यातील खासदार डॉ. सुभाष भामरे, खंडवा येथील खासदार ज्ञानेश्वर पाटील आणि बैतुलचे खासदार दुर्गादास उईके होते. महाव्यवस्थापक लालवानी यांनी प्रारंभी नागपूर आणि भूसावळ विभागात झालेल्या नवीन रेल्वे लाईन, दुहेररीकरण, तिहेरीकरण, विद्युतीकरण, एफओबी, आरओबी, आरयूबीच्या माध्यमातून रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करणे, अमृत भारत स्टेशन नियोजन, स्टेशन पुनर्विकास आदींच्या विकास कामाची माहिती दिली.
यानंतर उपरोक्त खासदारांनीही त्यांच्या त्यांच्या विभागातील रेल्वेशी संबंधित विकासकामे, अडचणीचा पाढा वाचला आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रत्येक खासदारांनी त्यांच्या त्यांच्या विभागातील मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास आणि अमृत भारत योजनेअंतर्गत विकास कामे करण्याची मागणी लावून धरली. प्रवाशांना जास्तीत जास्त आणि चांगल्या सुविधा मिळाव्या, या मागणीवरही जोर दिला. बैठकीला नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे आणि भूसावळ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया आणि रेल्वेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सहा तासांपूर्वीच जीएम रवानागुरुवारी रेल्वे सूत्रांकडून आलेल्या दाैऱ्यानुसार, महाव्यवस्थापक लालवानी शुक्रवारी सकाळी ७:४० ला नागपुरात येणार आणि दिवसभराचे कार्यालयीन कामकाज, बैठका आटोपल्यानंतर रात्री १०:३० मुंबईकडे जाणार, असे सांगण्यात आले होते. मात्र, आज सायंकाळी ४.४१ वाजताच जीएम एक्सप्रेस नागपूर स्थानकावरून मुंबईकडे रवाना झाली.