आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या धर्तीवर आता राज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र उघडण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ने यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात नागपूर व औरंगाबाद येथे हे केंद्र उघडण्यात येणार आहेत.अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना राज्याच्या नागरी सेवेत जास्तीत जास्त प्रमाणात संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बार्टीने पुढाकार घेतला आहे. यासाठी बार्टीचे महासंचालक कैलास कणसे विशेष प्रयत्नशील आहेत. यासाठी राज्यातील मागासभाग समजल्या जाणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्याला प्राधान्य देत नागपूर आणि औरंगाबाद येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद येथील केंद्र देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज, रेल्वे स्टेशन औरंगाबाद येथे तर नागपूरचे प्रशिक्षण केंद्र गुरुनानक इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी राधा स्वामी सत्संगजवळ, इंडियन आॅईल पट्रोल पंपसमोर, कळमेश्वर रोड दहेगाव नागपूर येथे राहणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाºया राज्यसेवा परीक्षा २०२० साठी विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठीही विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे, हे विशेष.
१ मेपासून प्रशिक्षणाला सुरुवातविद्यार्थ्यांची निवड झाल्यावर १ मेपासून प्रशिक्षणाला सुरुवात होईल. हे प्रशिक्षण केंद्र अनिवासी राहणार असून यात विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश राहील. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रशिक्षणासोबतच ९ हजार रुपये स्टायफंड, १५ हजार रुपये साहित्य खरेदीसाठी मिळतील.