नरेश डोंगरेनागपूर - अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे जीव वाचविण्याच्या उद्देशाने राज्यात मृत्यूंजय दूत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार, येत्या १ मार्चपासून राज्यातील महामार्गांवर ठिकठिकाणी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी हे देवदूत उभे असलेले बघायला मिळणार आहे.
देशात दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने आणि योग्य पद्धतीने उपचारासाठी मदत मिळत नसल्याने बऱ्याचशा जखमींचा मृत्यू होते, असे एका अहवालातून पुढे आले आहे. अपघात झाल्यानंतर बरेचवेळा जखमी रस्त्यावर विव्हळत असतो. आजुबाजुची मंडळी हे सर्व बघत असतात. परंतू, उगाच पोलिसांच्या कारवाईचे लचांड मागे लागू नये म्हणून जखमीला मदत करण्यास अनेकजण धजावत नाहीत. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन जखमींना तातडीने आणि योग्य पद्धतीने उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी ठिकठिकाणी सेवाभावी वृत्तीची प्रशिक्षीत मंडळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यातील महामार्गांवर ‘हायवे मृत्यूंजय देवदूत’ या उपक्रमाची योजना पोलीस दलासमोर ठेवली. शिर्षस्थ पातळीवरून तिला मंजुरी मिळाल्याने आता १ मार्च २०२१ पासून या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. अधिकाधिक अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे जीव वाचविणाऱ्या देवदुतांच्या कामाची नोंद करून त्यांना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेले पुरस्कारही दिले जाईल. या उपक्रमात आणखी काय करायला हवे, त्याला कसा प्रतिसाद आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या १५ आणि ३० तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातून आढावा घेतला जाणार असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.देवदुतांना मिळणार प्रशिक्षणमहामार्गावरील पेट्रोलपंप, हॉटेल्स, ढाबे तसेच मॉलमधील कर्मचारी आणि महामार्गालगतच्या गावातील सेवाभावी व्यक्ती असा प्रत्येकी ५ जणांचा ग्रुप त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करून निवडला जाईल. त्यांना सरकारी, निमसरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मार्फतीने अपघातग्रस्तांना कसे हाताळायचे, कसे उचलून स्ट्रेचर, वाहनात, अॅम्बुलन्समध्ये ठेवायचे, प्रथमोपचार कसा करायचा, त्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांच्याकडे प्रथमोपचाराची किट, स्ट्रेचर आणि आजुबाजुच्या हॉस्पिटल्सची नावे, ऍम्ब्युलन्सचा संपर्क क्रमांक उपब्ध करून दिला जाईल. त्यांना ओळखपत्र दिले जाईल आणि मृत्यूंजय देवदूत असे संबोधण्यात येईल.अनेकांचे जीव वाचवूपोलीस दलात राहून अनेक प्रशंसनीय उपक्रम राबविणारे अधिकारी म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची ओळख आहे. नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना त्यांनी मिशन मृत्यूंजय हा उपक्रम सुरू करून सुमारे ५ हजार शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांशी जोडले होते. कारागृहात असताना त्यांनी बंदिवान रजनी हा उपक्रम सुरू करून राज्य सरकारची प्रशंसा मिळवली होती. त्यांनी कारागृहात सुरू केलेल्या योगा आणि गळाभेट उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेकांचे जीव वाचविण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. उपाध्याय यांनी लोकमतजवळ व्यक्त केला.