लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल तीन महिन्यानंतर आलेल्या वीज बिलामुळे नागरिकांमध्ये वाढत असलेला असंतोष पाहता वीज वितरण कंपनी महावितरण ‘बॅकफूट’वर आली आहे. कंपनीचे अधिकारी लोकप्रतिनिधी व इतर विभागातील अधिकाऱ्यांना भेटून बिलासंदर्भात समजावून सांगत आहेत. तीन महिन्याचे बिल असल्यामुळे ते वाढलेले दिसून येत असल्याचे ते सांगत आहेत. ग्राहकांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून समजावण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.लॉकडाऊन दरम्यान २३ मार्चपासून मीटर रिडिंग व बिल वितरण झाले नाही. यादरम्यान नागरिकांनाच आॅनलाईन रिडींग पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु बहुतांश लोकांनी रिडींग पाठवले नाही. आता १ जूनपासून पुन्हा नियमित कामकाज सुरू झाले. मीटर रिडींग घेऊन बिल पाठवले जात आहे. त्यामुळे तीन महिन्याचे बिल एकाचवेळी आल्याने बिलाची रक्कम प्रचंड वाढली आहे. वाढीव बिलामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. ग्राहक कंपनीच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. वाढीव वीज बिलाविरुद्ध आंदोलनेही होत आहेत. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत. कार्यालयात दररोज होणारी गर्दी पाहता महावितरणने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत महावितरणचे अभियंते लोक प्रतिनिधींच्या भेटी घेत आहेत. पारशिवनी पंचायत समितीच्या बैठकीत कंपनीच्या अभियंत्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शनिवारी खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास ठाकरे, आ. मोहन मते, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर यांच्याशी चर्चा केली.कनिष्ठ अभियंता व एसडीओ आपापल्या क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी सुटीचा दिवस असतानाही भेटी घेण्यात आल्या. दरम्यान प्रत्येक असंतुष्ट नागरिकांना समजावण्यात येईल.दिलीप दोडके, प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण
वीज बिलामुळे महावितरण ‘बॅकफुटवर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 8:57 PM