लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारी बंददरम्यान महावितरणतर्फे थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्याच्या मोहिमेला प्रचंड विरोध झाला. बंगाली पंजा परिसरात वीज कनेक्शन कापल्याने संतापलेल्या विदर्भवाद्यांनी ते कनेक्शन पुन्हा जोडले. यादरम्यान प्रचंड गोंधळ वाढल्याने कारवाईसाठी आलेल्या लाइनमनने तेथून पळ काढला.
महावितरणचे पथक शनिवारी थकबाकीदारांचे कनेक्शन कापण्यासाठी बंगाली पंजा, लाल दरवाजा येथे पोहोचले होते. येथे एक दिव्यांग ग्राहक इमरान अली याने याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. समितीचे युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासूरकर, मध्य नागपूर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र भामोडे व प्रशांत जयकुमार हे कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत लाइनमनने चार थकबाकीदारांचे कनेक्शन कापले होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नारेबाची सुरू करताच लाइनमन तेथून निघून गेले. यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या परवानगीने कापलेली चारही वीज कनेक्शन जोडून दिले.
नागरिकांचे म्हणणे आहे की, महावितरणचे कर्मचारी त्यांना कुठलीही नोटीस न देताच त्यांचे वीज कनेक्शन कापण्यासाठी पोहोचले. इमरान अली याने सांगितले की, लॉकडाऊनदरम्यान त्यांना ७६ हजार रुपयांसह एकूण १ लाख रुपयांपेक्षा अधिक वीज बिल पाठविण्यात आले आहे. यावेळी लॉकडाऊन व कृषीपंपाचे वीज माफ करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली.
यावेळी जाफर खान, रमीज खान, इमरान अली, सैयद इमरान, तारीक अनवर वशीम शेख, शाहरुख शेख, फैजान खान, शेख नवाज, शोफी शेख, अब्दुल हबीब, सैयद पाशू अली, दानिश शेख, आशिष भोतमांगे, सारिक शेख, शुभम भोतमांगे आदी उपस्थित हाेते.
महावितरण करणार कारवाई
गांधीबागचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. जर ग्राहकाने कापलेले वीज कनेक्शन जोडले असेल तर त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी ॲक्टनुसार कारवाई केली जाईल.