- कॅमिटचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांची मागणी : सवलत द्यावी
नागपूर : कोरोना महामारीच्या कठीणसमयी व्यावसायिक आणि लघु व सूक्ष्म उद्योग बंद आहेत. व्यावसायिकांचे शटर दोन महिन्यांपासून डाऊन आहेत. अशावेळी महावितरणने सामान्य ग्राहक आणि लघु व सूक्ष्म उद्योजक व व्यावसायिकांना वीजदरात सवलत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. त्यांनी राऊत यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्या मांडल्या.
अग्रवाल म्हणाले, कोरोना लॉकडाऊनमुळे एसएमई आणि लहान व्यावसायिक महावितरण कंपनीमुळे अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. प्रशासनातर्फे वेळोवेळी ‘ब्रेक द चेन’ ऑर्डरचे पालन करून प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय करीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू आहेत, तर अन्य प्रतिष्ठाने दोन महिन्यांपासून बंद आहेत. अशा संकटकाळात वीज कंपनी सरासरी आधारावर बिल पाठवित आहे. बिल शटरच्या खालून टाकण्यात येत आहेत. शिवाय वेळेच्या आत बिल न भरल्यास व्याज आणि दंडासह कलेक्शन कापण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे व्यावसायिक संकटात आले असून, त्रस्त आहेत. एकीकडे लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत, तर दुसरीकडे कनेक्शन कापण्याचा इशारा देणे चुकीचे आहे. लॉकडाऊनचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना मानसिक त्रास होत आहे. वास्तविक पाहता लॉकडाऊनच्या कालावधीत व्यावसायिकांना डिमांड चार्ज आणि बिलावर व्याज व दंड माफ करावा, तसेच कनेक्शन कापू नये.
या मागणीवर राऊत यांनी सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कॅमिटचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल उपस्थित होते.