- एनव्हीसीसीची एमईआरसीकडे मागणी : व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा
नागपूर : काही दिवसापूर्वी महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (एमईआरसी) सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने एमईआरसीला निवेदन देऊन सुरक्षा ठेव कमी करण्याची मागणी केली आहे.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, गेल्या नऊ महिन्यापासून कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आणि व्यापारी आर्थिकरीत्या त्रस्त आहेत. यादरम्यान महावितरणने वीजदरात वाढ आणि आता सुरक्षा ठेव दुप्पट करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांवर आर्थिक भार येणार आहे.
चेंबरचे उपाध्यक्ष व ऊर्जा समितीचे संयोजक फारुखभाई अकबानी म्हणाले, लगतच्या राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेत विजेचे दर कमी असल्याने उद्योग-व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे राज्यातील उद्योग लगतच्या राज्यात जात आहेत. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासात अडथळा निर्माण होत आहे.
चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, एमईआरसीला कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता महावितरणने सुरक्षा ठेव वाढविण्याच्या प्रस्तावाला खारीज करून ग्राहकांना दिलासा देणे आणि वीजदर व फिक्स चार्ज कमी करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा.