लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वापरलेल्या विजेच्या देयकापोटी आलेल्या रकमेचा भरणा न करता महावितरण कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन वीज ग्राहकांच्या विरोधात वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी खरबी वितरण केंद्र येथील सहायक अभियंता हरीश मुंगसे आपले सहकारी तंत्रज्ञ असिफ शेख, तंत्रज्ञ खोडे, उच्चस्तर लिपिक काकडे यांच्यासोबत बाबा ताजनगर, शारदा सोसायटी परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकाकडून वीजबिल वसुली करत होते. थकबाकीदार वीजग्राहक शब्बीर शेख व शहजाद अली यांच्याकडे गेले असता दोन्ही वीज ग्राहकांनी यांनी मागील १८ महिन्यांपासून बिल भरले नव्हते. या थकबाकीदार वीजग्राहकाकडे अनुक्रमे २७,००० आणि ३१,००० रुपयांची थकबाकी होती. महावितरणकडून थकबाकी भरण्याची विनंती केली असता थकबाकीदार ग्राहकांनी सहकार्य करण्यास नकार दिला. अखेर नाईलाजाने महावितरणच्या जनमित्रांनी थकबाकीदार वीजग्राहक शब्बीर शेख व शहजाद अली या दोघांचा वीजपुरवठा कापला. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला म्हणून दोघांनी परिसरातील लोकांना जमा करून महावितरणच्या पथकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून व मारण्याची धमकी दिली. महावितरणच्या लिपिक श्रीमती खोडे यांचा मोबाइल हिसकावला. सदर बाबत तातडीने पोलीस यांना सूचना देण्यात आली, त्यांनी आरोपीना उचलून वाठोडा पोलीस स्टेशन मधे आणले. दोन्ही आरोपी वर कलम ५०४,५०६, प्रतिबंधक कायदा कलम १०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करतेवेळी महावितरणच्या काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, उपकार्यकारी अभियंते संजय मते उपस्थित होते. पोलीस अधिक तपास करीत आहेत.