लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारपासून महावितरणने या थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरु केली आहे. महावितरणतर्फे मागील पाच दिवसात तीन हजाराहून अधिक थकबाकीदारांचे कनेक्शन कापले आहे. ही कारवाई सुरू केल्यानंतर ग्रामीणमधील ११३५ व शहरातील ३७५१ ग्राहकांनी बिल भरले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ८८२ ग्राहकांनी एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत वीजबिल भरलेलेच नाही. या ग्राहकांवर २२०.४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. आता थकबाकीदारांना महावितरण शॉक देण्याच्या तयारीत आहे.
महावितरणचे जिल्ह्यात दोन सर्कल आहेत. शहर सर्कलमध्ये नागपूर शहर व हिंगणा-बुटीबोरी यांचा समावेश होतो. तर उर्वरित जिल्हा ग्रामीण सर्कलमध्ये येतो. कोरोनाचा प्रादुर्भााव वाढला तेव्हापासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर वीज बिल भरणे बंद केले होते. ग्रामीणमध्ये ५७,४९३ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत वीज बिल भरलेले नाही. त्यांच्यावर ५० कोटी ५३ लाख रुपयाची थकबाकी आहे. गेल्या पाच दिवसात ११३५ कनेक्शन कापण्यात आले आहे. दुसरीकडे महावितरणच्या आवाहनानंतर ५३५८ थकबाकीदारांनी ३.७७ कोटी रुपयाचे बिल भरून स्वत:ची कारवाई होण्यापासून सुटका करून घेतली.
शहर सर्कलचा विचार केला तर गुरुवारपर्यंत १६१६ कनेक्शन कापण्यात आले आहे. शुक्रवारी सुद्धा २५० कनेक्शन कापण्यात आले. या सर्कलमध्ये ८१,३८९ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून बिल भरलेले नाही. या ग्राहकांवर १६९.९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या चार दिवसात थकबाकीदारांनी ३ कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम भरून कारवाईपासून सुटका करून घेतली.
बॉक्स
सर्वाधिक थकबाकी सिव्हील लाईन्समध्ये, सर्वाधिक कारवाई काँग्रेसनगरमध्ये
शहर सर्कलचा विचार केला तर पाच डिव्हीजनमध्ये सर्वाधिक ५९.०२ कोटी रुपयांची थकबाकी सिव्हील लाईन्स डिव्हीजनची आहे. त्याचप्रकारे बुटीबोरीमध्ये ७.४ कोटी, काँग्रेसनगरमध्ये १६.५७ कोटी, गांधीबागमध्ये ३४.०१ कोटी व महाल डिव्हीजनमध्ये ५२.७९ कोटी रुपयाची थकबाकी आहे. परंतु कारवाईमध्ये मात्र काँग्रेसनगर पुढे आहे. येथे आतापर्यंत ६३७ थकबाकीदारांचे कनेक्शन कापण्यात आले. त्याचप्रकारे बुटीबोरीमध्ये १५८, सिव्हील लाईन्समध्ये ३८७, गांधीबागमध्ये ७२ व महाल डिव्हीजनमध्ये ३६२ वीज कनेक्शन कापण्यात आले आहे.