नागपूर : वाठोड्यातील समतानगता विजेचा धक्का लागल्याने सोमवारी ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर विजेच्या धक्क्याने दगावणाऱ्यांची आकडेवारी घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली. एप्रिल २०२० ते जानेवारी २१ या कालावधीमध्ये महावितरणच्या धक्क्याने नागपूर विभागात विजेच्या धक्क्याने दगावण्याच्या १८३ घटना घडल्या. त्यापैकी ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ८७ पशूंचाही मृत्यू झाला आहे.
ही आकडेवारी महावितरणच्या नागपूर झोनची आहे. या झोनमध्ये अर्बन सर्कल (नागपूर शहर, हिंगणा-बुटीबोरी) रुरल सर्कल (उर्वरित जिल्हा) आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश असलेला वर्धा सर्कलचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्याची स्थिती लक्षात घेता एप्रिल ते जानेवारी या कोरोना संक्रमणाच्या काळात १०७ घटना घडल्या. यात ३९ व्यक्तींचा जीव गेला. ४१ पशूंचाही मृत्यू झाला. नागपूर शहरात या दहा महिन्यात ११ व्यक्ती आणि १३ पशू मृत्युमुखी पडले. बहुतेक घटनांमधील कारण बेपर्वाई हे सांगितले जाते. कूलरच्या कारणामुळे प्रत्येक उन्हाळ्यात किमान डझनावर व्यक्तींचा मृत्यू होतो, असा महावितरणचा दावा आहे. तर ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतीला पाणी देताना अशा घटना अधिक प्रमाणात घडतात. अर्थिंग योग्यपणे न दिल्याने रिव्हर्स करंट येतो, त्यातून अशा घटना घडतात. ग्रामीण भागात जनावरे विजेच्या खांबांना बांधल्यानेही घटना घडत असल्याची माहिती आहे.
...
अशा घडल्या घटना
परिसर कार्यालयीन बाहेरील घटना पशू एकूण
मृत घायल मृत घायल मृत घायल
अर्बन सर्कल ० २ ११ ५ १३ ० ३१
रुरल सर्कल १ १ २७ ९ ३८ ० ७६
वर्धा १ ० ३२ ६ ३६ १ ७६
नागपूर झोन २ ३ ७० २० ८७ १ १८३
...
फक्त १० प्रकरणात नुकसान भरपाई
विजेचा धक्का लागल्यास मदतीचे प्रावधान आहे. पशू दगावल्यास ३० हजार व मनुष्यहानीसाठी ४ लाख रुपयांची मदत मिळते. इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरच्या अहवालावरून मदत ठरते. बऱ्याच प्रकरणात मदतच मिळत नाही. नागपूर झोनमधील १८३ पैकी फक्त १० प्रकरणातच मदत मिळाली. ९ पशुमालकांना प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले. माणसांच्या ७२ प्रकरणात फक्त एकच प्रकरण मदतपात्र ठरले.
...
कर्मचाऱ्यांवारही संकट
झोनमधील मृतांमध्ये महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कामावर असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. यातील एक नागपूर ग्रामीणमधला तर दुसरा वर्धा जिल्ह्यातील आहे. अन्य घटनेत तीन कर्मचारीही जखमी झाले होते. त्या सर्वांना कंपनीच्या नियमानुसार मदत मिळाली आहे.
...
कोट
विजेचा उपयोग सतर्कतेने करायला हवा. उन्हाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वीच कंपनीकडून जनजागृती केली जाते. कूलर वापरासंदर्भात गाईडलाईन दिल्या जातात. तरीही दुर्लक्षामुळे घटना घडतात. इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरच्या अहवालानुसार नुकसानभरपाई दिली जाते.
- दिलीप दोडके, मुख्य अभियंता, महावितरण