लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने महावितरणच्या तयारीची पोलखोल केली. मान्सूनसाठी महावितरण पूर्णपणे सज्ज असल्याचा दावाही यामुळे फोल ठरला आहे. इतकेच नव्हे खास मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर महावितरणने तब्बल ५ कोटी ११ लाख रुपये मंजूर केले आहेत. परंतु यासंदर्भात आतापर्यंत केवळ ७१.८७ लाख रुपयांचीच कामे झाल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे दर आठवड्याला मेंन्टेनन्सची नेमकी कोणती कामे केली जात होती, असा प्रश्नही यातून निर्माण झाला आहे.
भामटी, कार्पोरेशन कॉलनी, डागा ले-आऊट, गोपालनगर, गांधीनगर आदी परिसरातील नागरिकांना मंगळवारची रात्र अंधारात काढावी लागली. जवळपास एक डझनभर झाडे आणि त्यांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्या. त्या हटवून वीज पुरवठा पूर्ववत करण्यास खूप वेळ लागला असे महावितरणचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने शहरातील इतर भागातील परिस्थितीची पाहणी केली तेव्हा बहुताांश ठिकाणी विजेची लाईन झाडांच्या फांद्यांनी वेढलेली दिसून आली. सध्या मान्सून सक्रिय झाला आहे, अशा परिस्थितीत वादळी पावसात पुन्हा मंगळवारसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महावितरणने मेंन्टेनन्स व मान्सूनपूर्व कामासाठी अनेक एजन्सी तैनात केलेल्या आहेत. या एजन्सींना तांत्रिक कामांसह विजेच्या लाईनवर झाडांच्या फांद्या येणार नाहीत, यासाठी झाडांच्या फांद्या कापण्याची जबाबदारीही सोपवण्यात आलेली आहे. मेंन्टेनन्सचे काम प्रिवेंटीव्ह, ब्रेकडाऊन व आर एण्ड एम अशा तीन भागात विभागण्यात आले आहेत. प्रिव्हेंटीव्ह कामांसाठी विशेष म्हणजे मान्सूनपूर्व तयारीसाठी नागपूर अर्बन सर्कलमध्ये ५ कोटी ११ लाख रुपयाचे बजेट मंजूर आहे. परंतु यासंदर्भात आतापर्यंत केवळ ७१.८७ लाख रुपयाचीच कामे झाली आहेत. याचा सरळ अर्थ असा निघतो की, महावितरणने मान्सूनपूर्व तयारीकडे गांभीर्याने लक्षच दिले नाही. शहरातील परिस्थिती सुद्धा हेच संकेत देतात. ही तरतूद पाण्यातच जाणारी आहे. मान्सून लागण्यापूर्वी कुठेही झाडांच्या फांद्या कापण्यात आल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे पाऊस येताच झाडांच्या या फांद्या तूटून विजेच्या तारांवर पडतील आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही परिस्थिती अशा वेळचीआहे जेव्हा महावितरणकडे या कामासाठी अजूनही ४३९.६४ लाख रुपये उपलब्ध आहेत. अशा कामांसाठी सर्वात कमी ४.२६ लाखाचा निधी काँग्रेस डिव्हीजनने खर्च केला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी या डिव्हीजनमधील वस्त्यांमधील वीज २७ तास बंद होती. दुसरीकडे महावितरणवर असाही आरोप केला जात आहे की, बुधवारी मेंन्टेनन्सच्या नावावर केवळ वीज बंद ठेवली जात आहे. काम मात्र काहीही होत नाही. याचा फटका मात्र नागरिकांना बसणार आहे. तेव्हा युद्धस्तरावर काम करून ही समस्या सोडविण्याची मागणी महावितरणकडे केली जात आहे.
झाडांच्या फांद्या पुन्हा वाढतात
महावितरणचा असा तर्क आहे की, झाडांच्या फांद्या कापल्या तरी त्या खूप लवकर वाढतात. त्यामुळे त्या वारंवार छाटाव्या लागतात. शहरातील अनेक भागातील वीज लाईन भूमिगत करून ही समस्या सोडविण्यात आली आहे. मान्सूनपूर्व तयारीची यंत्रणाही सशक्त केली जाईल.
प्रिव्हेंटीव्ह कामांसाठी तरतूद
डिव्हीजन मंजूर निधी खर्च शिल्लक रक्कम (निधी लाखात)
काँग्रेस नगर १०२.०८ ४.२६ ९७.८२
गांधीबाग १०२.०८ ७.२८ ९४.८०
एमआईडीसी/ बुटीबोरी १०२.०८ २१.१० ८०.९८
सिव्हील लाईन्स १०२.०८ १२.५९ ८९.४९
महाल १०३.१९ २६.६४ ७६.५४
----------------------------------------------------------------
एकूण ५११.५१ ७१.८७ ४३९.६४