सावनेर : ग्राहकांपर्यंत विद्युत सोयीसुविधा देण्यासाठी बिलाचा भरणा योग्य वेळी होणे गरजेचे असते. असे असले तरी कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत अनेकांकडील विद्युत बिल थकीत आहेत. यामुळे विद्युत विभागाची एकूणच कार्यप्रणाली प्रभावित झाली असून आर्थिक ताणही अधिक वाढलेला आहे. सावनेर विभागात एकूण २४ कोटी ६८ लाख रूपयांची थकबाकी असून मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीने थकबाकी वसुलीचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत १० कोटी २६ लाख रुपयांची वसुली विद्युत कंपनीने केली असून शंभर टक्के वसुलीसाठी युद्धस्तरावर मोहीम आखली जात आहे.
महावितरण सावनेर विभागांतर्गत सावनेर, पारशिवनी, खापा, खापरखेडा, मोहबा आणि कळमेश्वर असे सहा उपविभाग येतात. या उपविभागात थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. जून २०१९ अखेर सावनेर विभागात लघुदाब वीज ग्राहकांची थकबाकी १२ कोटी १२ लाख रुपये होती. जुलै २०१९ ची मागणी १२ कोटी ५६ लाख रुपये झाली. सावनेर विभागाला एकूण २४ कोटी ६८ लाख रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य आहे. यापैकी १० कोटी २६ लाख वसूल करण्यात आले.
थकबाकीदारांनी थकीत रकमेचा तातडीने भरणा करावा आणि विद्युत विभागास सहकार्य करावे, असे आवाहर सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीपक भस्मे यांनी केले आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथदिवे ग्राहकांची थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे. पंधराव्या वित्त आयोगाचे नुसार वीज देयके भरण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला असून सावनेर विभागातील कृषी ग्राहकांची थकबाकी तब्बल ५९ कोटी १ लाख रुपये आहे.
कृषी ग्राहकांनी सवलतीचे कृषी धोरण प्रत्येक कृषी ग्राहकापर्यंत पोहचविण्याचा उपक्रम सुरू आहे. यात थकबाकी वरील व्याज आणि विलंब आकार शंभर टक्के माफ करून सुधारित थकबाकीच्या पन्नास टक्केच रक्कम ग्राहकांना भरायची आहे. कृषी धोरणाचा लाभ सावनेर विभागातील एकूण २,९९१ ग्राहकांनी घेतला. यातून एकूण ५ कोटी ७० लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. उर्वरित १६,५९० ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले आहे. सदर मोहीम प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे.