नॅशनल व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम : अनेक मोठ्या कंपन्यांचा सहभाग नागपूर : एमएसएमई डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्यावतीने एमआयए, बीएमए व डिक्कीच्या सहकार्याने दोन दिवसीय नॅशनल व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम तथा औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सोमवारी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदास कृपाल तुमाने यांच्या हस्ते हिंगणा येथील एमआयए हाऊसमध्ये थाटात उद्घाटन झाले. हा कार्यक्रम उद्या २८ फेबु्रवारीपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमएसएमई डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक पी. एम. पार्लेवार होते. अतिथी म्हणून एमआयएचे अध्यक्ष सी. के. रणधीर, बीएमएचे अध्यक्ष नितीन लोणकर, डिक्की नागपूरचे अध्यक्ष निश्चय शेळके व विजय कुमार उपस्थित होते. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात देशातील मोठमोठ्या कंपन्यांनी भाग घेतला असून, त्यात डब्ल्यूसीएल, मॉईल, एमईसीएल, एनपीसीएल, सेंट्रल रेल्वे, माझगाव डॉक यासारख्या अनेक बड्या कंपन्यांचा समावेश आहे. शिवाय या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. दरम्यान, कृपाल तुमाने यांनी आपल्या भाषणातून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एमएसएमईच्या संचालकांचे कौतुक केले. तसेच अशा प्रदर्शनातून विदर्भातील छोट्या व मध्यम व्यावसायिकांना एक प्लॅटफॉर्म मिळून त्याचा त्यांना व्यवसायात फायदा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पी. एम. पार्लेवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. (प्रतिनिधी)
एमएसएमईचे औद्योगिक प्रदर्शन
By admin | Published: February 28, 2017 2:00 AM