वसीम कुरेशी
नागपूर : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आता एसटी महामंडळाच्या बसेस राज्य करणार आहेत. गुरुवारपासून नागपूर ते शिर्डीसाठी बससेवा सुरू करण्यासोबतच आता नव्या वर्षात जानेवारीपासून १२ बसेस चालविण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आता समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून गती घेण्याच्या तयारीत आहे. येथे बसेसच्या वेगाला बंधन राहणार नाही. या मार्गाने एसटी महामंडळ लांब पल्ल्याचे अंतर कमी वेळात पूर्ण करणार आहेत. सूत्रानुसार एसटीच्या नागपूर विभागात वेगाने धावणाऱ्या बसेस वेगळ्या करून त्या लांब पल्ल्यासाठी चालविण्यात येणार आहेत.
औरंगाबाद, पुणे आणि जालनासाठीही बसेस
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एसटी महामंडळ गुरुवारपासून औरंगाबादसाठी स्लिपर कम सीटर बस चालविण्यात येणार आहे. नागपूर आणि औरंगाबाद येथून रात्री १० वाजता या बसेस सुटतील. त्यानंतर व्हाया औरंगाबाद किंवा जालना पुण्यासाठी बस चालविण्यात येईल. शिर्डीसाठी पुढील २० दिवसात अर्धा डझन बसेस चालविण्याची अपेक्षा आहे.
समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट! नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ
सातत्याने सुरू आहे निरीक्षण
समृद्धी महामार्ग तयार होताच एसटी महामंडळ पूर्वीच्या तुलनेत अधिक व्यावसायिक झाल्याचे दिसत आहे. एसटीची तयारी पाहून खासगी वाहनांना एसटी मागे पाडणार असे दिसत आहे. सूत्रानुसार एसटी महामंडळाची एक चमू समृद्धी महामार्गावर आठ दिवसांसाठी सर्वेक्षणावर निघाली आहे. यात गाडीचा वेग, मुक्कामाचा वेळ, पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, प्रवाशांचा आराम, प्रवासभाडे आदींचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येत आहे.
शिर्डीसाठी बसेस वाढवू
‘लवकरच शिर्डीसाठी आणखी बसेस चालविण्यात येतील. याशिवाय औरंगाबादसह इतर शहरांसाठी बसेस सुरू करण्यात येतील. २५० नव्या बसेस येणार आहेत. कमी अंतरासाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्यात येतील.’
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर