नागपूर : महाराष्ट्राच्या रस्ते मार्गाला एक वेगळी गती देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आजपासून एसटीनेही पाऊल ठेवले. या महामार्गावर आज गुरुवारी, १५ डिसेंबरपासून एसटीची विशेष प्रवासी बस नागपूरहूनशिर्डीला रवाना झाली.
नागपूर ते मुंबई मार्गावर वेगाचा काटा गतीने फिरविणारा, तसेच अंतर कमी करणाऱ्या या महामार्गाचे लोकार्पण रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानंतर लगेच या मार्गाचा अनेकांनी वापरही सुरू केला. ७ ते ९ तासांचा कालावधी लागणाऱ्या नागपूर-शिर्डीचे अंतर आता केवळ ५ तासांत पूर्ण होणार असल्यामुळे खासगी बसचालकांचा उत्साह वाढला आहे. त्यांचे तीन तासांच्या अंतराचे डिझेल अन् त्यापोटी होणारा हजारोंचा खर्च कमी झाला असून तो त्यांच्यासाठी अधिकचा नफा ठरला असल्याने ट्रॅव्हल्स संचालकांनी या मार्गाचा वापर सुरू केला आहे. ते लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळानेही आपली बससेवा या मार्गावर सुरू करण्याचे तीन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार, गुरुवारी १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी बससेवा सुरू करण्यात आली.
विभाग नियंत्रकांनी दाखवली झेंडी
आज पहिल्याच दिवशी शिर्डीला जाण्यासाठी २२ प्रवाशांनी हजेरी लावली. गुरुवारी रात्री ९ वाजता गणेशपेठ बसस्थानकावर या बसला विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी हिरवी झेंडी दाखवली. ही बस शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता शिर्डीत दाखल होणार आहे.