नागपूर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य घेऊन अहोरात्र धावणाऱ्या ‘लालपरी’ने आज ७५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त नागपूच्या गणेशपेठ बसस्थानकावर बुधवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केक कापून व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
१ जून १९४८ रोजी महाराष्ट्रात एसटीची सेवा सुरू झाली. तेव्हापासून ती प्रवाशांना घेऊन रात्रंदिवस धावते. गावखेड्यापासून महानगरापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एसटीने ७४ वर्षांत अनेकदा कात टाकली. कधी आशियाड म्हणून तर कधी शिवशाही म्हणूनही धावली; मात्र महानगरातील असो की गावखेड्यात असो, प्रवासी तिला लाडाने एसटीच म्हणतात. ती आता शिवाई म्हणून नव्या रूपात अधिक आरामशाही प्रवासाची सेवा देण्यास सज्ज आहे. विशेष म्हणजे, शिवाई ई-बस आहे. पुण्यातून तिचा आज शुभारंभ होणार असून, नंतर राज्यातील विविध आगारात ती येणार असल्याचे अधिकारी सांगतात.
फुलांची सजावट अन् रांगोळीही
अमृत महोत्सवी वर्षांत प्रवेश करणाऱ्या एसटीच्या स्वागतासाठी बसस्थानकाला फुलांनी सजविण्यात आले, रांगोळी काढण्यात आली.
चालक, वाहकांसह प्रवाशांचेही स्वागत
आगारातील अधिकाऱ्यांनी स्थानकावर केक कापून प्रवाशांना मिठाई वाटण्यात करण्यात आली. यावेळी एसटीचे अधिकारी, कर्मचारी एसटीच्याच नव्हे तर चालक, वाहकांसह प्रवाशांचेही स्वागत करण्यात आले.