विदर्भात १२ रिसॉर्ट : कसा होणार विदर्भातील पर्यटनाचा विकास? नागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीचे (एमटीडीसी) नागपूर विभागात एकूण १२ रिसॉर्ट, तीन व्यावसायिक गाळे आणि एक उपाहारगृह आहे. मात्र एमटीडीसीच्या नागपूर विभागीय कार्यालयाने आपल्या या १२ रिसॉर्टपैकी तब्बल ९ रिसॉर्ट, एक उपाहारगृह आणि तीन व्यावसायिक गाळे खासगी लोकांच्या हाती सोपविले असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंबंधी स्वत: एमटीडीसीच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात ही माहिती प्राप्त झाली आहे. त्या माहितीनुसार एमटीडीसीचे खिंडसी येथे मेघदूत रिसॉर्ट, राजकमल रिसॉर्ट, पेंच (सिल्लारी) येथे पर्यटन निवास, खेकरानाला येथे पर्यटन निवास, आंभोरा येथे पर्यटन निवास, बोरधरण येथे पर्यटन निवास, ताडोबा (मोहर्ली) येथे उपाहारगृह, गडकुंभली येथे पर्यटननिवास व पवनी येथील पर्यटन निवासासह सिव्हिल लाईन्स नागपूर येथील पर्यटन निवासात उपाहारगृह आणि तीन व्यावसायिक गाळे आहेत. मात्र यापैकी केवळ सिव्हिल लाईन्स येथील पर्यटन निवास, ताडोबा, वर्धा व बोदलकसा येथील पर्यटन निवास वगळता इतर सर्व रिसॉर्ट, उपाहारगृह आणि व्यावसायिक गाळे खासगी लोकांना भाडेपट्टीवर दिले आहे. विशेष म्हणजे, यापैकी अनेकजण मागील कित्येक वर्षांपासून या सर्व रिसॉर्टवर कब्जा करून बसले आहेत. त्यांना एमटीडीसीकडून वेळोवेळी मुदतवाढ दिल्या जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एमटीडीसीला या सर्व संपत्तीच्या भाड्यातून वार्षिक ४२ लाख २३ हजार ३४० रुपयांचा महसूल मिळतो. मात्र असे असताना विदर्भातील पर्यटन मागील कित्येक वर्षांपासून उपेक्षित आहे. एमटीडीसीचे नागपूर विभागीय कार्यालयाने आपले सर्व रिसॉर्ट खासगी लोकांच्या हाती सोपवून स्वत: केवळ रिसेप्शनिस्टची भूमिका वटवत आहे. विदर्भात पर्यटन विकासासाठी भरपूर संधी आहे. परंतु असे असताना एमटीडीसीतर्फे येथील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी कवडीचे प्रयत्न झालेले दिसून येत नसून, या विभागाला केवळ नवनवीन रिसॉर्ट बांधून ते खासगी लोकांना भाडेपट्टीवर देण्यात अधिक आवड दिसून येते.(प्रतिनिधी)
एमटीडीसीचे रिसॉर्ट खासगी लोकांच्या हाती
By admin | Published: October 30, 2016 2:36 AM