लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसची चिंता कमी होताना दिसून येत नाही. मागील पाच दिवसांत ६२ रुग्ण व १२ मृत्यूची भर पडली आहे. शनिवारी १० रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५७७ वर पोहचली असून, मृतांची संख्या १५० झाली आहे. १०७१ रुग्ण बरे झाले आहेत.
म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. मात्र, मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झालेल्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शनिवारी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच असे म्युकरमायकोसिसचे १० रुग्ण भरती झाले. विशेष म्हणजे, यातील तीन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. या रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णांची संख्या ५४७, तर खासगी रुग्णालयातील रुग्णांची संख्या १०३०वर पोहोचली आहे. खासगी रुग्णालयात आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. येथे मृतांची संख्या ११५, तर शासकीय रुग्णालयात ३५ झाली आहे. सध्या शासकीय रुग्णालयात १९९, खासगीमध्ये १५७ असे एकूण ३५६ रुग्ण उपचाराखाली आहेत.
११५१ रुग्णांवर शस्त्रक्रिया
शासकीय रुग्णालयात आतापर्यंत ३५३ तर, खासगी रुग्णालयात ७९८ असे एकूण ११५१ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात मेयोमध्ये ६६, मेडिकलमध्ये २१४, शासकीय दंत रुग्णालयात ४७, ग्रामीण रुग्णालयात ५४, तर खासगी हॉस्पिटलमध्ये ८९२ शस्त्रक्रिया झाल्या. शासकीय रुग्णालयातून २७१, तर खासगी रुग्णालयातून ८०० रुग्ण बरे होऊन घरी परतले.