नागपूर : म्युकरमायकोसिसवर महागडा व दीर्घ कालावधीपर्यंत चालणार उपचार आणि शासकीयच्या तुलनेत खासगीमध्ये उशिरा मिळणाऱ्या औषधींमुळे मेडिकलमध्ये या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. महिन्याभराच्या कालावधीत १५० रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांना तातडीने उपचार व शस्त्रक्रियेची गरज पडते. मेडिकलने तसे नियोजन केल्याने रुग्णसेवेत त्याचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे. परिणामी, इतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयांसाठी हे नियोजन ‘मॉडेल’ ठरू पाहत आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना म्युकरमायकोसिसच्या नव्या संकटाचा भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (मेडिकल) पडला आहे. दीड महिन्यापूर्वी आठवड्यातून एक-दोन रुग्णांची नोंद होत असताना आता रोज ५ ते १० रुग्णांना दाखल करून घ्यावे लागत आहे. यामुळे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील व ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक नितनवरे यांनी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे नियोजन केले आहे. यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात आहे.
- म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी कॅज्युअल्टीमध्ये विशेष सोय
मेडिकलचा कॅज्युअल्टीमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी कान, नाक व घसा विभागाने (ईएनटी) विशेष सोय केली आहे. येथे ईएनटी डॉक्टरांची एक टीम तैनात केली आहे. म्युकरमायकोसिस व कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गंभीर रुग्णाला ‘आयसीयू ३’मध्ये किंवा ‘वॉर्ड ११’मध्ये भरती केले जात आहे. रुग्णाची प्रकृती सामान्य असल्यास त्याला वॉर्ड १४, १५ व १६ मध्ये दाखल केले जात आहे. रुग्ण कोरोना निगेटिव्ह किंवा पोस्ट कोविड असल्यास त्याला वॉर्ड १७ मध्ये भरती केले जात आहे.
- रुग्णासाठी विविध विषयातील तज्ज्ञाची टीम
म्युकरमायकोसिच्या रुग्णांना मायक्रोबायलॉजिस्ट, इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट, इन्टेन्सिव्हिस्ट, न्युरोलॉजिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट, ऑप्थेल्मोलॉजिस्ट, डेंटिस्ट, मॅक्सिलोफेशिअल किंवा प्लॅस्टिक सर्जन व बायोकेमिस्ट अशा विशेषज्ञाच्या सेवांची गरज पडते. या सर्वांची एक टीम तयार करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार त्यांची सेवा रुग्णाला दिली जात आहे.