लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : नागपूर पंचायत समितीचे गटसाधन केंद्र आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जाण्यासाठी चिखल तुडवीत जावे लागत असून, कार्यालयाच्या आवारात तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तीला कार्यालयात पाेहाेचताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नागपूर-काटोल मार्गावरील जि. प. कन्या शाळेच्या प्रांगणात नागपूर पंचायत समितीचे गटसाधन केंद्र आणि गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालय आहे. कार्यालयासभाेवताल सर्वत्र चिखल झाला आहे. कार्यालयात ये-जा करताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत असून, नागरिकांना मनस्ताप साेसावा लागताे. प्रशासकीय कामे तसेच आरटीई प्रवेश पडताळणीची कामे करण्यासाठी येणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रचंड त्रास होत आहे. दुचाकीवरून आणि पायी येणारे नागरिक अनेकदा चिखलात घसरून पडले आहेत. या गटसाधन केंद्राचे कर्मचारी नाईलाजाने चिखल तुडवत कार्यालयात पोहचतात. परंतु दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात पाेहाेचण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यांच्याकडे तीनचाकी सायकल असूनही चिखलामुळे केंद्रात पाेहचता येत नाही.
मुख्य रस्त्यापासून गटसाधन केंद्राचे अंतर ५०० मीटर आहे. हे अंतर चिखल तुडवत जावे लागते. दरवर्षी पावसाळ्यात हा त्रास असून, याकडे लाेकप्रतिनिधी व प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते. गटसाधन केंद्रात ३२ कर्मचारी असून, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, गट समन्वयक अधिकारी यांची कार्यालये आहेत. शालेय शिक्षण विभागाचे संपूर्ण कामकाज गटसाधन केंद्रात चालते. असे असतानाही कर्मचाऱ्यांना नाहक त्रास साेसावा लागत आहे.
080721\img_20210708_162428.jpg
फोटो