()
नागपूर : पावसाळ्याच्या दरम्यान बांधकाम, रस्त्याचे खोदगाम आदी कामे मनपा प्रशासनाकडून थांबविण्यात येतात; परंतु नियमांकडे दुर्लक्ष करून पारडी फ्लायओव्हरचे बांधकाम सुरू आहे. पिल्लर टाकण्यासाठी पूर्ण चौक खोदण्यात आला आहे. खोदण्यात आलेल्या गड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. रस्त्याच्या कडेला खोदकामाच्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर चिखल पसरला आहे.
नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) तर्फे फ्लायओव्हरचे बांधकाम करण्यात येत आहे. सोबतच मेट्रो रेल्वेचे कामही सुरू आहे. त्यामुळे प्रजापतीनगर ते पारडी चौकादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वर्धमाननगरातील बँक ऑफ इंडियापासून पारडी चौकादरम्यान दोन पिलरचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याचीही अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रात्रीच्या वेळी येथून अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी यासंदर्भात स्थानिक नगरसेवक चेतना टांक, प्रदीप पोहणे यांच्याकडे तक्रार केली. गुरुवारी नागरिकांनी नगरसेविका चेतना टांक यांना बोलावून रस्त्यावर पसरलेला चिखल व खराब झालेले रस्ते दाखविले. त्यांनी तत्काळ मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना यासंदर्भात हस्तक्षेप करून लोकांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली.
- खड्ड्यांमुळे होऊ शकतो जीवघेणा अपघात
प्रजापतीनगर ते एचबी टाऊन चौकादरम्यान मोठमोठे खड्डे पडलेले आहे. खाणापूर्ती म्हणून खड्ड्यात माती व चुरी टाकण्यात आली आहे. पावसामुळे माती व चुरी रस्त्यावर पसरली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. या रस्त्यावर मेट्रो रेल्वे अथवा एनएचएआयने विजेची व्यवस्था केली नाही. एखादी नवीन व्यक्ती रस्त्यावरून गेल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. दोन्ही यंत्रणा मोठा अपघात होण्याची वाट बघत आहेत.
- अवडज वाहनांची रोकथांब नावाचीच
रात्री अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातली आहे; परंतु ही रोकथांब नावाचीच आहे. रात्रीच्या वेळी २० फुटांच्या या रस्त्यावर अवजड वाहनांचे अवागमन सुरू असते. अशात या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीचालकांना अपघात होण्याची भीती असते. येथील लोकप्रतिनिधीदेखील दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.