लाेकमत न्यूज नेटवर्क
बेसूर : स्थानिक वाॅर्ड क्रमांक २ मधील मुख्य रस्ता पुढे पिरावा व खंडारझरी गावाला जाेडला जाताे. या मुख्य वर्दळीच्या रस्त्याची गेल्या दाेन वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. पहिल्याच पावसात हा रस्ता चिखलमय झाल्याने रहदारी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती कधी हाेणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
गावातील या मुख्य रस्त्यालगत कृषी विद्यालय असून, रस्त्यातील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागताे. रस्त्यातील खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबक्यात रूपांतर झाले. यामुळे खड्ड्याचा अंदाज चुकून दुचाकीस्वारांचे अपघात घडतात. दुसरीकडे, पिरावा येथील गाेकुल खाणीतील वाहनांची याच मार्गाने ये-जा असते. खाणीत जाणारे स्फाेटकाचे वाहनसुद्धा या रस्त्याने जाते. परंतु रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहने उलटण्याची शक्यता असल्याने एखाद्यावेळी स्फाेटके भरलेल्या वाहनाला अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र अद्यापही दुरुस्ती न झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना नाहक त्रास साेसावा लागणार आहे. या रस्त्याच्या समस्येकडे स्थानिक प्रशासन कानाडाेळा करीत असल्याचा आराेप नागरिक करीत आहेत.