लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विनाकारण रस्त्यावर किंवा बाजारात फिरणाऱ्यांनी पोलिसांसोबत मुजोरी केल्यास त्यांना दंड्याचा प्रसाद मिळू शकतो. पोलिसांसोबत कारवाईदरम्यान वाद घातला तर पोलीस कोठडीत जाण्याचीही त्यांच्यावर वेळ येऊ शकते. कोरोनाचा धोका रोखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, सोमवारपासून शहरात ते बघायला मिळणार आहे.
नागपुरातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येने सर्वत्र चिंता वाढविली आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान सामान्य नागरिकाला त्रास होऊ नये म्हणून अन्नधान्य, किराणा, भाजी, ब्रेड, दूध, फळे अन् अत्यावश्यक चीजवस्तूंच्या पुरवठ्यासोबत औषधांची दुकाने खुली राहणार आहेत. ते खरेदी करण्यास नागरिक बाहेर पडू शकतात. मात्र, क्वारन्टाईनचा शिक्का ज्यांच्या हातावर आहे, अशांना रस्त्यावर फिरण्याची मुभा नाही. आवश्यक कामाच्या किंवा उपचाराच्या निमित्ताने नागरिक बाहेर पडू शकतात. मात्र, प्रत्येकाजवळ ओळखपत्र अन् घराबाहेर पडण्याचे ठोस कारण असावे. अन्यथा त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे. कोरोनाचा धोका वाढू नये, नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधाने रस्त्यावर पोलिसांशी वाद घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
बस, ट्रेन, विमानसेवा सुरू असून, त्यातून बाहेर जाण्यास किंवा शहरात येण्यास मनाई नाही. मात्र, विनाकारण कुणी शहरात येऊ नये म्हणून नागपूरला जोडणाऱ्या आठही सीमा सील करण्यात आल्या आहेत. एकूण १०७ ठिकाणी दिवसा, तर ७४ ठिकाणी रात्री नाकेबंदी राहणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची गस्त राहणार असून कुठे काही गडबड गोंधळ झाला, तर पोलिसांच्या मदतीसाठी एसआरपीएफच्या दोन कंपन्या, आरसीपीची सहा पथके, ५०० होमगार्डसही ठेवण्यात आले आहेत.
----