लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी वर्गभेद नष्ट करणे, गरीब-श्रीमंत भेद नष्ट करणे, कायमची आर्थिक प्रतिष्ठा नष्ट करणे हे ध्येय असल्यानेच शरच्चंद्र मुक्तिबोधांच्या कादंबरी विश्वातला नायक हा कायम साम्यवादी विचारांनी प्रेरित असल्याचे मत प्राचार्य डॉ. रमेश अंधारे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभाग व विदर्भ साहित्य संघाच्या वतीने सुरू असलेल्या शरच्चंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत अंधारे ‘मुक्तिबोधांचे कादंबरी विश्व’ या विषयावर बोलत होते.
या आभासी यंत्रणेद्वारे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उपस्थित होते.
मुक्तिबोधांनी क्षिप्रा, सरहद्द व जन हे वोळतू जेथे अशा तीन कादंबऱ्या लिहिल्या. या कादंबऱ्यांमध्ये दारिद्र्य, दु:ख आणि स्वार्थाचे मूल्यांकन त्यांनी केले. त्यात वास्तवाचे भान आहे आणि समूह शक्तीनेच अपेक्षित परिवर्तन शक्य आहे, असे ठाम मत असल्याचे अंधारे यावेळी म्हणाले. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. संचालन ऋचा वगरकर मांजरखेडे यांनी केले तर आभार वर्षा पतके थोटे यांनी मानले.
* आज जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता
विदर्भ साहित्य संघ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने कविवर्य शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघाच्या अमेय सभागृहात पार पडेल.
..........
‘’?!