नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक जबाबदारीत फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्याकडे आता गुजरातचे प्रभारी महासचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विदर्भातील नेत्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी वासनिक यांच्या नियुक्तीमुळे माजी मंत्री नितीन राऊत यांचे नाव मागे पडले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीने माजी मंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती. त्यानुसार राऊत यांनी अहवालही तयार केला. तेव्हापासून नितीन राऊत हे भविष्यात गुजरातचे प्रभारी होतील, अशी चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली होती. मात्र, अ.भा. काँग्रेस कडून वासनिक यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली. वासनिक यांनी केरळ, तामीळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, राजस्थान, अंदमान-निकोबार या राज्यांचे प्रभारी म्हणून काम केले आहे, हे विशेष.
उत्तर प्रदेशात बदल, महाराष्ट्रात काय ?
- अ.भा. काँग्रेस समितीने उत्तर प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष बदलत माजी आमदार अजय राय यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तोंडावर बदल होईल का, याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.