लोकमत विशेष
वसीम कुरेशी
नागपूर : उपराजधानीत मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट अॅड नागपूर (मिहान) ची सुरुवात होऊन दहा वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. गावांचे पुनर्वसनही झाले आहे. परंतु जनावरांची व्यवस्था अद्याप झालेली नाही. मिहानसाठी ज्या पाच गावांची जमीन घेण्यात आली, त्यांचे तबेले आतापर्यत येथेच असून जवळपास ३० हजार जनावरे मिहान परिसरात चरताना दिसतात.
मिहान परिसरातील कलकुही, तेल्हारा, दहेगावचे पुनर्वसन झाले आहे. परंतु शिवणगावचे अर्धेच पुनर्वसन झाले असून खापरीचे पुनर्वसन शिल्लक आहे. गावकऱ्यांच्या मते या गावातील नागरिकांचा शेती आणि दुग्ध उत्पादन हाच मुख्य व्यवसाय आहे. परंतु जनावरांसाठी काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे ते संकटात सापडले आहेत. स्थानिक रहिवासी व दुग्ध व्यवसाय करणारे संजय बोडे यांनी सांगितले की, पुनर्वसनाच्या अध्यादेशात जनावरांसाठी जागा देण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट (एमएडीसी) च्या अधिकाऱ्यांनी जनावरांच्या संख्येबाबत सर्वेसुद्धा केला आहे. त्यानंतर शंकरपूर व बेलतरोडी दरम्यान ४५ एकर शासकीय जागा ठरविण्यात आली. परंतु पुढे काहीच कारवाई करण्यात आली नाही. शिवणगाव येथील रहिवासी अमोल वानखेडे यांनी सांगितले की, गावकरी आता दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. गावाचे पुनर्वसन तर होईल परंतु जनावरांना त्यापासून वेगळे कसे ठेवता येईल. त्यांना कुठेही चरण्यासाठी जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी योग्य जागेचा पर्याय लवकर शोधणे गरजेचे आहे.
..........
जागा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन
‘मिहान परिसरातील तबेले किंवा जनावरांना इतरत्र स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव एमएडीसी मुख्यालयात विचाराधीन आहे.’
-दीपक जोशी, जनसंपर्क अधिकारी, एमएडीसी, नागपूर
...............