ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - मुंबई महापालिकेत भाजपा व शिवसेनेची युती झाली पाहिजे. दोन्ही पक्षांनी मानापमान बाजुला सारुन एकत्र आले पाहिजे व अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घेतले पाहिजे. जागांचा आकडा लक्षात घेता पहिली संधी शिवसेनेला मिळायला हवी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व जेष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मुंबईत भाजप-शिवसेनेची युती व्हावी असे मला वाटते. जर युतीची मुंबईत सत्ता आली तर राज्य शासनाला तेथे आणखी प्रभावीपणे काम करता येईल व त्यामुळे सरकारची लोकप्रियता वाढेल. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांना ही बाब सहन होणार नाही. भाजपा-सेना एकत्र येऊ नये साठी कॉंग्रेस प्रयत्न करत आहे. मुंबईत महापौर पदासाठी पाठिंबा देण्याकरता काँग्रेस राज्य सरकारमधून बाहेर पाडण्याची सेनेला मागणी करू शकते. जर शिवसेनेने कॉंग्रेसची मदत घेतली, तर शासन पडू शकते व मध्यावधी निवडणूकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे वैद्य म्हणाले. शिवसेनेने विचार करुन निर्णय घ्यावा, असेदेखील ते म्हणाले.
संघ मध्यस्थी करणार नाही
या वादात संघाची भुमिका काय राहते, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. मात्र मा.गो.वैद्य यांनी संघाची येथे भुमिकाच राहणार नसल्याचे स्पष्ट केले. संघ या वादात कुठलीही मध्यस्थी करणार नाही. संघाची ती कार्यप्रणाली नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे ते भाजपाचे नेते घेतील, असे वैद्य यांनी सांगितले.