लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टॉक मार्केटमध्ये रक्कम गुंतवण्यास भाग पाडून मुंबईच्या चार शेअर ब्रोकर्सनी नागपुरातील एका विमा अधिकाऱ्याला दोन कोटींचा गंडा घातला. या प्रकरणात सदर पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ पिलानी (वय ३६), त्याचे वडील प्रमोद पिलानी (रा. नालानिसोड, कांदीवली पश्चिम मुंबई), यश संजय रसद (वय २७, रा. दहिसर पश्चिम मुंबई) आणि संजय सदाशिव रसद (बोरिवली, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.फिर्यादी ललित सुंदरदास अंबवानी (वय ४७, रा. चौधरी चौकाजवळ, नागपूर) हे एलआयसीत डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत. रसद पितापुत्र एलआयसीचे काम करतात. त्यामुळे त्यांच्याशी अंबवानीची ओळखी आहे. आरोपींनी दोन वर्षांपूर्वी पिलानी पिता-पुत्रासोबत अंबवानीची ओळख करून दिली. शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळतो, असे सांगून आरोपींनी अंबवानींना रक्कम गुंतविण्यास बाध्य केले. त्यांच्यावर विश्वास ठेवून अंबवानीने १ कोटी २ लाख रुपये गुंतविले. त्यावर अंबवानींना १ कोटी ५१ लाख, ९२ हजारांचा फायदा झाला. त्यातील ५० लाख, ५० हजार रुपये अंबवानीला सिद्धार्थ पिलानी याने परत केले. ५ डिसेंबर २०१७ ते २६ मार्च २०१८ या कालावधीत सदरमधील कॉर्पोरेशन बँकेमार्फत हा व्यवहार पार पडला. अंबवानी यांनी आपली मूळ रक्कम १ कोटी, २ लाख, रुपये परत करा आणि उर्वरित नफ्याची रक्कम परत शेअर मार्केटमध्ये गुंतवा, असे म्हटले. मात्र, आरोपींनी त्याकडे दुर्लक्ष केले. ते रक्कम परत करण्यास टाळाटाळ करू लागल्याने अंबवानीने त्यांच्यामागे तगादा लावला. त्यावर आरोपी प्रमोद पिलानी याने अंबवानींना माझे अनेक गुंडांसोबत संबंध आहेत. तुम्ही तुमची रक्कम विसरून जा. पुन्हा रक्कम मागितली तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. आरोपींनी तब्बल दोन कोटी, दोन लाख, ४२, ५२२ रुपये बुडविल्याने अंबवानीने सदर ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोहन डेरे यांनी या प्रकरणाचा तपास करून गुरुवारी रात्री उपरोक्त चार आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.