नागपूर : मुंबई, ठाण्याच्या परिसरातील तस्करांकडून सुटका केलेल्या ‘स्टार’ प्रजातीच्या ७० कासवांना विदर्भातील ताडाेबा अभयारण्यात मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २१ कासवांना साेडण्यात आले आहे. यापूर्वी कासवांना राज्याबाहेर साेडले जायचे पण यावेळी पहिल्यांदा ताडाेबा अभयारण्यात साेडण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
मुंबई व ठाणे परिसरात अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करांद्वारे हे कासव बेकायदा घरी पाळण्यात आले हाेते. हे कासव स्टार प्रजातीचे असल्याचे सांगितले जात आहे. ठाणे वनविभागाने कारवाई करीत तस्करांकडून अशाप्रकारच्या ७० कासवांना ताब्यात घेतले. ती ठाणे वनविभागाच्या ताब्यात हाेती. त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे आवश्यक हाेते. राज्यात त्यांच्यालायक अधिवास नसल्याने आतापर्यंत पकडलेल्या कासवांना कर्नाटकमध्ये साेडले जात हाेते. दरम्यानच्या काळात ताडाेबा अभयारण्यातील मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनक्षेत्रात या कासवांना पूरक ठरेल असा अधिवास उपलब्ध असल्याची बाब ताडाेबा वनविभागाच्या लक्षात आली. ताडोबा अभयारण्यात यापूर्वी स्टार कासवे आढळून आल्याचे आणि पूर्वी त्यांचा अधिवास असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. त्यानुसार सर्व ७० कासव ठाणेहून चंद्रपूरला आणण्यात आले व येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आली.
वनविभागाद्वारे यापैकी २१ कासवांना मंगळवारी ताडाेबाच्या ठरलेल्या अधिवासात साेडले. या कासवांवर वनविभाग किमान आठवडाभर लक्ष ठेवणार आहे. कासवांच्या प्रकृतीमध्ये बिघाड न झाल्यास उर्वरित कासवांनाही टप्प्याटप्प्याने याठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती ताडाेबाचे डीसीएफ रामगावकर यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. त्यामुळे कर्नाटकमध्ये कासवांना सोडण्याऐवजी राज्यातच कासवांना ठेवण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.
ताडाेबा अभयारण्यात अशाप्रकारे कासवांचा अधिवास असल्याचे पाहिले गेले आहे. हे महत्त्वाचे सर्वेक्षण आहे. आतापर्यंत स्टार कासवांना कर्नाटकला साेडावे लागायचे. मात्र आता राज्यातील त्यांना अधिवास मिळेल. सध्या साेडलेल्या २१ कासवांचा आठवडाभर अभ्यास केला जाइल. ते सुखरूप राहिले तर उर्वरित कासवांनाही मुक्त केले जाईल.
- जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक व वनसंरक्षक, ताडाेबा व्याघ्र प्रकल्प