नागपूर : शिवसेनेने नागपूरसह संपूर्ण विदर्भावरदेखील लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्क मोहिमेच्या माध्यमातून पक्ष संघटनेला सशक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पक्षाचे नेते खा. संजय राऊत सोमवारी नागपुरात पोहोचले. नागपूरच्या नेत्यांना मुंबई जास्त आवडते व आम्हाला नागपूर प्रिय आहे, असे वक्तव्य त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
संपर्क मोहिमेअंतर्गत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाने विदर्भ व मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. मंगळवारपासून पक्षाचे खासदार विदर्भ व मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचतील. त्यांच्यासमवेत मुंबई व ठाण्यातील २०-२० कार्यकर्त्यांची चमू असेल. चार दिवसांनंतर सर्व खासदार पक्षप्रमुखांना अहवाल सादर करतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
भाजप नेते पंतप्रधानांना झोपू देणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झोपेचे तास कमी करणार, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले. पंतप्रधान जवळजवळ १८ तास काम करतात हे सगळ्यांना माहीत आहे. आता उरलेल्या वेळेत त्यांना झोपू द्यायचे नाही असे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ठरवले असावे, त्यानुसार महाराष्ट्रातील भाजपचे नेते कामाला लागले आहेत. भाजपच्या राज्यातील नेत्यांना झोप येतच नाही, कारण त्यांची झोप शिवसेनेमुळे उडाली आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.