लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्ततुकाराम मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी काही अतिउत्साही महाभागांनी महापालिका मुख्यालयाच्या दाराजवळ मुंढे यांचा शुभेच्छा फलक लावला. मात्र, तुकाराम मुंढे यांनी हा फलक पाहिल्यानंतर तात्काळ काढण्यास लावला. या घटनेबद्दल शिस्तप्रिय आणि कायद्याबद्दल आग्रही अधिकारी अशी प्रतिमा असलेले आयुक्त या फलकासंदर्भात काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सिव्हिल लाईन्स परिसरात महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागे असलेल्या महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत तळमजल्यावर मुंढे यांचे कार्यालय आहे. दिनचर्येनुसार सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कार्यालयात दाखल झाले. तेव्हा इमारतीच्या मुख्य पोर्चमध्ये जिथे त्यांची कार रोज थांबते आणि मुंढे खाली उतरल्यावर ज्या ठिकाणी त्यांची नजर जाते, नेमकं त्याच ठिकाणी एक भलेमोठे फलक त्यांना दिसले. तुकाराम मुंढे यांच्या फोटोसह या फलकावर समस्त नागपूरवासीयाकडून तुकाराम मुंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा संदेश लिहिण्यात आला होता. हे फलक पाहून हा नियमांचा भंग असल्याने मुंढे यांनी तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकांना ते फलक लगेच काढण्याची सूचना केली. त्यांनतर ते फलक तिथून लगेच काढण्यात आले. विशेष म्हणजे महापालिका सार्वजनिक ठिकाणी अशा बेकायदेशीर फलकांवर कारवाई करते. शहराच्या विद्रुपीकरणासंदर्भात असे फलक लावणाऱ्यांवर कारवाईही केली जाते. यासंदर्भात आयुक्त काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अन् शुभेच्छांचा फलक मुंढेंनी काढायला लावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 1:00 AM