निशांत वानखेडे
नागपूर : महाराष्ट्र शासनाने नुकतेच राखीव वनक्षेत्र म्हणून घाेषित केलेल्या नागपूर वनविभाग अंतर्गत मुनिया आणि माेगरकसा जंगलात रानमेव्याचा खजिना लपलेला आहे. या रानमेव्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाेंद झाली आहे. या दाेन्ही जंगलांत जवळपास १६० प्रकारांची रानफळे, रानभाज्या आढळून आल्या आहेत. यावर केलेले संशाेधन आंतरराष्ट्रीय मासिकात प्रकाशित करण्यात आले आहे.
नागपूर वनविभागांतर्गत उमरेडचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार आणि आयुर्वेद महाविद्यालयाच्या सहयाेगी प्राध्यापक डाॅ. रूपाली चांदेवार यांनी मुनिया आणि माेगरकसा राखीव वनक्षेत्रात दाेन वर्षे अभ्यास करून संशाेधन पेपर तयार केला. राज्य शासनाने मे २०२१ मध्ये मुनिया आणि ऑक्टाेबर २०२२ मध्ये माेगरकसा जंगलाला राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला हाेता. दाेन्ही ठिकाणी निसर्गाने भरभरून जैवविविधता दिली आहे. चांदेवार यांनी दाेन वर्षे अभ्यास करून रानमेव्याची नाेंद केली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार मुनिया क्षेत्रात ६४ प्रजाती आणि माेगरकसा वनक्षेत्रात ९१ प्रजातींचा रानमेवा उपलब्ध आहे. त्यांनी अभ्यास करून संशाेधन पेपर तयार केले. त्यांचे हे संशाेधन नुकतेच दि. ४ एप्रिल २०२३ राेजी ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इनाेव्हेटिव्ह रिसर्च’ या आंतरराष्ट्रीय मासिकात प्रकाशित झाले.
वनमजूर व स्थानिकांची मदत
दाेन्ही जंगलात अभ्यास करताना वनविभागाचे वनरक्षक, वनमजूर आणि आसपासच्या नागरिकांची मदत घेतल्याची माहिती नरेंद्र चांदेवार यांनी दिली. हा रानमेवा सहज ताेडून खाण्यायाेग्य असून, स्थानिक नागरिक त्यांच्या राेजच्या आहारात त्याचा उपयाेग करतात. त्यांचे वैशिष्ट, ताे काेणत्या ऋतुंमध्ये मिळताे, अशी माहिती स्थानिकांकडून गाेळा केली.
बाॅटनिकल नाव व आराेग्यदायी गुणधर्म
चांदेवार यांनी केवळ यादी तयार केली नाही तर त्या त्या रानमेव्याचे बाॅटनिकल नाव काय, ते काेणत्या प्रजाती, कुटुंबात येतात याचीही तपशीलवार नाेंद केली. शिवाय प्रत्येक रानमेव्याचे आराेग्यदायी गुणधर्मही संशाेधनात नमूद केले आहे.
काही प्रमुख रानमेवा
आवळा, टेंभरून, जांभळे, येरवणी, कंदमुळे, ताड, माड, खापरफुटी, चाराेळी, रुई, तराेटा, वेलभाजी, पातुर भाजी, बाटवा, मुसळ भाजी, बांबू वास्ते, मटारू, उंबर, कडू भाजी, लाखाेरी, मधुमालती, महुआ, खिरणी, भाराटी, कुर्ता, अंबाेटी, शिंदी, खचरकंद, कुसुम, बेहडा, बिबा अशा नानाविध रानफळे, रानभाज्यांचा समावेश आहे.
वनविभागाने केला सत्कार
नरेंद्र चांदेवार व डाॅ. रूपाली चांदेवार यांच्या कार्याची दखल घेत प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे व नागपूर विभागाचे उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा यांनी नागपूर वनविभागातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. नागपूर विभागात अशाप्रकारचे पहिलेच संशाेधन हाेय.
गृहउद्याेगातून मिळेल राेजगार
या दोन्हीं संशोधनाचा उपयोग राखीव क्षेत्राचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्याकरिता आणि जंगलाजवळ गृहउद्याेग स्थापन करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता होईल, असा विश्वास नरेंद्र चांदेवार यांनी दिला.