नागपूर : महापालिकेचा वर्ष २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. आज सादर करणार आहेत. सुमारे ३ हजार २०० कोटींचा हा अर्थसंकल्प असून, मागील वर्षाच्या तुलनेत ५५० कोटींनी अधिक रकमेचा राहण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय राजवट असली तरी माजी पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कारभार होत असल्याची चर्चा आहे. याचा विचार करता व आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता कोणत्याही प्रकारची करवाढ न करता नागरिकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आपली बस सेवेसाठी नव्या १५० इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षे विविध विकासकामांना ब्रेक लागला. मात्र, पुढील वित्त वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिक अनुदान प्राप्त होण्याची अपेक्षा गृहीत धरून महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये सर्वाधिक ७० टक्क्यांच्या आसपास वाटा केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा असणार आहे. तर नगर रचना, मालमत्ता कर, जलप्रदाय विभागाकडून अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.