लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक संकटातून जाणाऱ्या मनपाचा २०२०-२१ चा सुधारित आणि २०२१-२२ चा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी आयुक्त राधाकृष्णन बी. स्थायी समितीला सादर करतील. मागील वर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २,५४७ कोटींचा तर स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यातुलनेत किती लक्ष्य गाठण्यात मनपाला यश आले. तसेच पुढील वर्षाचा आर्थिक अंदाज प्रस्तावित अर्थसंकल्पातून वर्तविला जाईल. बुधवारी दुपारी १२ वाजता स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होत आहे.
कोरोनाच्या महासाथीमुळे जाहीर झालेली टाळेबंदी, बंद पडलेले उद्योगधंदे, बांधकाम व्यवसायाला आलेली अवकळा याचा फटका मनपाच्या आर्थिक स्थितीला बसला. दोन वर्षापासून विकास कामे जवळपास ठप्प आहेत. मालमत्ता कराचे लक्ष्यही पूर्ण करता आलेले नाही. नगर रचना विभाग वसुलीत नापास ठरला तर पाणीकर व बाजार विभागाचे उत्पन्नही लक्ष्यापर्यंत पोहोचले नाही. अशा परिस्थितीत आयुक्तांच्या अर्थसंकल्पाकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. खर्र्चाला मोठी कात्री लावल्यास पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.