नागपूर : मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपींनी लाखो रुपये हडपल्याची बाब समोर आली आहे. जरीपटका पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुभाष डाहाट (३५, इंदिरानगर) हे एका कंपनीत डेली व्हेजेसवर काम करतात. त्यांच्या परिचयातील सचिन डागोर (३५, गोकुळपेठ) याने त्याची नागपूर महानगरपालिकेत ओळख असून तेथे सफाई कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, अशी बतावणी केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मे २०२० मध्ये सुभाष यांनी त्याला दीड लाख रुपये दिले. मात्र, सहा महिने सचिनने काहीच काम केले नाही. त्यानंतर त्याने कोरोनाचे कारण देत टाळाटाळ केली. नंतर त्याने फोन उचलणेदेखील बंद केले. सुभाष यांनी चौकशी केली असता सचिनने आणखी काही लोकांकडून अशीच बतावणी करून पैसे उकळल्याची बाब कळाली. त्यांनी सचिनला गाठून पैसे परत करण्यास सांगितले. सचिनने त्यांना दीड लाख रुपये परत करतो, असे स्टॅंपपेपरवर लिहून दिले. मात्र, त्यानंतर त्याने पूर्णत: संपर्क तोडला. अखेर सुभाष यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सचिनविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पैसे उकळले व वरून गाडी चोरीची तक्रार केली
जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीची दुसरी घटना घडली. दीपक साखरे (मॉडेल टाऊन) यांचा मुलगा आशिष हा नोकरीच्या शोधात होता. इलेक्ट्रिक रिपेरिंगचे काम करणाऱ्या प्रशांत केवलदास जामगडे (४४, बेझनबाग) याच्यासोबत त्यांची ओळखी झाली. वडील एमएसईबीमध्ये अधिकारी होते व ते तुमच्या मुलाला नोकरी लावून देऊ शकतात, असा दावा त्याने केला. काही दिवसांत नोकरीची ऑर्डर हाती येईल, असे सांगत त्याने २०२१ मध्ये साखरे यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले. मात्र, नोकरीबाबत त्याने त्यानंतर टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. साखरे यांनी तगादा लावला असता त्याने दोन कोरे धनादेश तसेच दुचाकी गाडी गॅरंटी म्हणून साखरे यांच्याकडे ठेवली. यानंतर त्याने जरीपटका पोलिस ठाणे गाठत दुचाकी चोरी गेल्याची तक्रार केली. पोलिस ठाण्यात साखरे गेल्यावर त्याने तक्रार मागे घेतली. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने तीन लाख रुपये परत देतो, असे स्टॅंपपेपरवर लिहून दिले. त्याने त्यानंतरदेखील पैसे परत दिले नाहीत. अखेर साखरे यांनी त्याच्याविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी प्रशांतविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.