नागपूर : नागपूर शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मनपासह वाहतूक पोलिस, केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी या सर्व विभागांनी प्रयत्न करावे, यासाठी मनपातर्फे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी बैठक घेतली. बैठकीला उपायुक्त रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) जयेश भांडारकर, मनपा परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, ‘नीरी’च्या प्रिसिंपल सायंटिस्ट संगीता गोयल, कार्यकारी अभियंता अल्पना पाटने, सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राजेंद्र पाटील, सल्लागार डॉ. गीतांजली, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार डॉ. संदीप नारनवरे आदी उपस्थित होते. वायू गुणवत्ता सुधारणा आणि बळकटीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेने सीएसआयआर-नीरी चे सहकार्य घेतले आहे. वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून काम करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
वायु गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेचे कार्य
वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे परिवहन सेवेमध्ये विद्युत बसेसचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेने १४४ नवीन ई-बसेससाठी कार्यादेश दिला असून, ६० ई-बसेस सध्या सेवेत आहेत. वाडी, हिंगणा आणि लकडगंज येथील चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोचे काम देखील पूर्ण झाले आहे. वाठोडा बस डेपोचे काम सुरू आहे. शहरात हरीत क्षेत्राच्या विकासासाठी उद्यान विभागाद्वारे विविध कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. यातील भारत माता उद्यानामध्ये हरीत क्षेत्र विकसित करण्यात आलेले आहे. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. पर्यावरणपूरक दहन घाटांच्या विकासासाठी कार्यादेश दिले आहे. याशिवाय सर्वाधिक प्रदूषणाची नोंद असलेल्या व नागरी वस्तीनिहाय गंगाबाई घाट, मोक्षधाम घाट आणि मानेवाडा दहन घाटांवर वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली लावण्याचे कामाची निविदा काढण्यात आली आहे. जयताळा, चिंचभुवन आणि फ्रेन्ड्स कॉलनी येथील दहनघाट विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.