नागपूर : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार होतात. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे 'स्टॉप डायरिया' अभियान लोकसहभागातून मनपास्तरावर राबविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यासंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेऊन सूचना दिल्या. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत 'स्टॉप डायरिया' अभियान राबविण्यात येत आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहोचविणे हे या अभियानाचे उद्दीष्ट आहे. “अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊनी साथ” हे या अभियानाचे घोषवाक्य आहे. या अभियानामध्ये महापालिका हद्दीतील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.
पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी झोननिहाय आणि नागरी प्राथमिक आरोग्य स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ८ आठवडे हे अभियान चालणार असून, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत.
अभियान यशस्वी करण्यासाठी झोनस्तरावरवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले. बैठकीला मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. मंजुषा मठपती, डॉ. शिल्पा जिचकार, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ. अतिक खान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ सूलभा शेंडे, डॉ. वर्षा देवस्थळे, दीपाली नागरे आदी उपस्थित होते.