नागपूर : महानगरपालिकेत सत्ता येण्यासाठी काँग्रेसला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. मनपा निवडणुका हेच पक्षाचे ध्येय असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वागत समारंभादरम्यान ते बोलत होते. यावेळी नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी मनपा निवडणुकीबाबत चर्चादेखील केली.
वाढत्या महागाईमुळे लोकांचा भाजपवर भ्रमनिरास होत असून, त्याचा पुरेपूर फायदा महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळू शकतो. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आता कंबर कसून मैदानात उतरले पाहिजे. ब्लॉक आणि बुथ स्तरावर कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच जनतेच्या समस्या ठळकपणे मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे पटोले यांनी सांगितले.
गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेची कोणती कामे लटकत आहेत, कुठे गडबड झाली आहे, याचे संपूर्ण सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे आहे, असेदेखील ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार, उद्योग व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष अतुल कोटेचा, उत्तर भारतीय सेलचे प्रमुख उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, उमेश डांगे, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव राजा तिडके, माजी नगरसेवक प्रशांत धवड, योगेश (गुड्डू) तिवारी, बाळ कुलकर्णी, नीलेश खांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.