नागपूर : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका उशिरा होत आहेत. या विलंबाला तत्कालिन महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. या विषयावर आत्ताच अधिक बोलणे योग्य होणार नाही असेही ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, मविआ सरकारने चुकीच्या पद्धतीने २०११ च्या जनगणनेनुसार कुणाचाही सल्ला न घेता नियमाच्या बाहेर जाऊन साडेचार टक्के लोकसंख्या वाढ दाखविली. त्यानंतर मविआमधील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक सुप्रीम कोर्टात गेले. त्यापैकी एका ठिकाणी त्यांच्या विरुद्ध निकाल लागला. आता ते सुप्रीम कोर्टात गेल्यावर त्यांनाच फटका बसला आहे. निवडणुकांना उशीर होण्यासाठी सर्वस्वी महाविकास आघाडी व याबाबत घेतलेला चुकीचा निर्णय जबाबदार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी भाजपशी संपर्क केला नाही- विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत येणारी माहिती, बातम्या आणि प्रसंग सगळेच कपोलकल्पित आहे. अजित पवार यांनी भाजपाकडे कुठलाही संपर्क केला नाही. त्यांचे विरोधक हे काम करीत आहे. उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेले तेव्हापासून या बातमीला सुरुवात झाली, असे अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे. संजय राऊत यांच्याविषयी बावनकुळे म्हणाले, अजित पवार यांनीच याबाबतची सुरुवात कुणी केली हे सांगितले आहे. पवार यांच्या इमेजला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यांच्याबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश
- बूथ सशक्तीकरण अभियानातून मनपरिवर्तन व मतपरिवर्तन करून प्रत्येक बूथवर २५ पक्षप्रवेश व राज्यात २५ लाख पक्ष प्रवेश होतील. प्रत्येक मंगळवारी पक्ष कार्यालयात मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.