नागपूर : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी परिपत्रक जारी करून सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक लिमिटेडची २३ जुलैला होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सहकारी संस्थेचे कर्मचारी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपत्ती निवारण कार्यात लागले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर शहर-१ यांच्यातर्फे मनपाला पत्र देण्यात आले आहे. १५ जुलैला जारी करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २५० हून कमी सदस्य असलेल्या संस्था वगळता अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील ती ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, असे यात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार मनपा कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
शासनाच्या पुढील आदेशानुसारच निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे मनपा सहकारी बँक निवडणुकीत परिवर्तन पॅनल, लोकक्रांती पॅनल व कर्मचारी-शिक्षक आघाडी पॅनलच्या माध्यमातून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. काही अपक्षांचाही समावेश होता.
प्रशासकीय कामकाजावर परिणाम
बँक निवडणुकीत उतरलेले उमेदवार आपापल्या स्तरावर प्रचाराला लागले होते. यामुळे मुख्यालयासह झोन कार्यालयातील वर्ग ३ व ४ चे कर्मचारी मोठ्या प्रमाणात रजेवर गेले आहेत. शहरात अतिवृष्टीच्या काळात नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण होत नव्हते. यामुळे मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी विभाग प्रमुखांची अनुमती न घेता रजेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले होते.