जुन्या वैमनस्यातून वाद : सतीश नेरळ बचावले, कारची तोडफोड नागपूर : जुन्या वैमनस्यातून एका युवकाने मनपाचे कार्यकारी अभियंता सतीश नेरळ यांच्यावर आपल्या साथीदारांच्या मदतीने हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी सिव्हील लाईन्स चिटणवीस सेंटरजवळ घडली. चिटणवीस सेंटरमध्ये लपल्याने नेरळ यांचा जीव वाचला. हल्लेखोरांनी त्यांच्या कारची तोडफोड करून चालकाला मारहाण केली. हिलटॉप येथील ५४ वर्षीय सतीश नेरळ हे महापालिकेत कार्यकारी अभियंता आहेत. त्यांचा पुतण्या उद्देश हा ३० आॅक्टोबर रोजी कारने बाजारात जात होता. उद्देशच्या कारने वस्तीत राहणाऱ्या पुष्कर जीवन पोरशेट्टीवार याचा मित्र नवीन भारतीच्या कारला धडक दिली. यावरून उद्देशचे पुष्कर आणि नवीनसोबत भांडण झाले. दोघांनी उद्देशला धमकावलेही होते. याबाबत नेरळ यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. यावरून पुष्करचा नेरळ यांच्यावर राग होता. बुधवारी सकाळी ११.४० वाजता नेरळ हे कारने घरी कार्यालयात जाण्यासाठी निघाले. चालक राहुल गणवीर हा कार चालवित होता. पुष्कर कारने त्यांचा पाठलाग करू लागला. चिटणवीस सेंटरजवळ पुष्करने नेरळ यांच्या कारला ओव्हरटेक करीत त्यांच्या कारसमोर आपली कार थांबवली. नेरळ यांना कारच्या बाहेर ओढले. चालक राहुललाही मारहाण करीत बाहेर काढले. पुष्कर आणि त्याचे साथीदार नेरळ यांना मारहाण करू लागले. नेरळ आपला जीव वाचवित चिटणवीस सेंटरच्या दिशेने पळाले. रस्त्यावर मारहाण होत असल्याने लोक कारच्या दिशेने येऊ लागले. लोकांना पाहताच पुष्कर आणि त्याच्या साथीदारांनी कारची तोडफोड करीत पळ काढला. नेरळ यांनी कुटुंबीयांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. सीताबर्डी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पुष्कर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध दंगा, मारहाण आणि हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. पुष्करने मंगळवारी रात्री सुद्धा नेरळ यांना धमकावले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले.(प्रतिनिधी)
महापालिका अभियंत्यावर हल्ला
By admin | Published: November 03, 2016 3:28 AM