लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात नागपूर महानगरपालिकेची प्रत्येकी एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली. बुधवारी शिक्षण समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली.यावेळी समिती उपसभापती प्रमोद तभाने, समिती सदस्य रिता मुळे, प्रणिता शहाणे, हर्षला साबळे, मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद, उपायक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, क्रीडाधिकारी पीयूष अंबुलकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर प्रामुख्याने उपस्थित होते.नागपूर महानगरपालिका व आकांक्षा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक अशा सहा शाळा इंग्रजी माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. आकांक्षा फाऊंडेशनच्या माध्यमातून मनपाच्या सहाही शाळा अद्ययावत करण्यात येणार आहे. पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, मुंबई आणि नवी मुंबई मनपाच्या धर्तीवर आता नागपूर महानगरपालिकेच्या शाळा अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली.स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मनपा शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेसंदर्भात मनपाचे स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या ठरावाला बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत मनपा शाळेतील विद्यार्थी दुर्धर आजारी पडल्यास त्याला विम्याची रक्कम देण्यात येणार आहे किंवा दुर्दैवाने विद्यार्थी मृत पावल्यास त्याचा पालकांना निधी देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी दिली.मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. याबाबतचे धोरण तयार करून लवकरात लवकर समितीपुढे सादर करावे, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले. मनपा शाळेत गणित व्याख्याता हे पद रिक्त आहे. यूडीसी संवर्गातून रोस्टरनुसार शिक्षकांच्या आलेल्या अर्जावर पद भरण्याच्या प्रस्तावाबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मनपाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना द्वितीय गणवेश दिला की नाही, याचा आढावा सभापती दिलीप दिवे यांनी शाळा निरीक्षकांमार्फत घेतला.शिक्षकांचा पगार बायोमेट्रिकद्वारे जोडणारमनपा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा पगार हा बायोमेट्रिकद्वारे जोडण्यात येणार असल्याचा ठराव बैठकीमध्ये पारित करण्यात आला. गौरव डोमले यांनी बायोमेट्रिक मशीन्सचा तीन महिन्यांचा अहवाल बैठकीत सादर केला.
नागपुरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सुरू होणार महापालिकेची इंग्रजी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 10:35 AM
नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात नागपूर महानगरपालिकेची प्रत्येकी एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.
ठळक मुद्देशिक्षण समितीचा निर्णय पुणे, मुंबईच्या धर्तीवर अंमलबजावणी