नागपूर : हनीट्रॅप प्रकरणाची तक्रार करणारे व चौकशीनंतर स्वत:च महिलेशी चॅटिंग करताना आढळलेले महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती. याची दखल घेत पालिका प्रशासनाने राजेंद्र उचके यांना निलंबित केल्याची अधिकृत माहिती आहे.
नियमानुसार सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी याला पोलिसांनी एखाद्या प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर तो ४८ तास पोलिस कोठडीत राहिल्यास प्रशासन त्याला निलंबित करू शकते, असा नियम आहे. उचकेंच्या अटकेची अधिकृत सूचना प्रशासनाला मिळाली नव्हती. वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या आधारावर मनपा प्रशासनाने पोलिसांना त्यांच्या अटकेसंदर्भातील माहिती मागितली होती. पोलिसांकडून आलेल्या माहितीच्या आधारावर उचकेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.