नागपूर : स्वच्छता व पर्यावरणाबाबत नागपूर शहराच्या घसरत चाललेल्या रॅंकिंगबाबत वेगवेगळी कारणे आहेत. शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनात असलेल्या त्रुटी त्यास कारणीभूत आहेत. म्हणूनच शहरातील ७८ टक्के नागरिक मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनाबाबत असमाधानी असल्याचे समाेर आले आहे. कचऱ्याचे कंत्राट दिले असल्याने मनपा लक्ष देत नाही आणि कंत्राटदार ‘चालते तसे चालू द्या’ या भूमिकेतून काम करीत आहेत. त्यामुळे स्वच्छतेचे व्यवस्थापन ‘चालचलाऊ’ असल्याची भावना लाेकांची झाली आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी ‘सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (एसएफएसडी) या संस्थेने फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन सर्वेक्षण केले. संस्थेच्या लीना बुद्धे यांनी सांगितले, झाेपडपट्ट्यांसह शहरातील दहा झाेनमधील नागरिकांची या सर्वेक्षणात मते जाणून घेण्यात आली. यामध्ये तरुण, प्राैढ, वयाेवृद्ध, सुशिक्षित, उच्च शिक्षित, गरीब-श्रीमंत अशा सर्व गटातील नागरिकांचा सहभाग हाेता. घनकचरा व्यवस्थापनाबाबत वेगवेगळ्या प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते नाेंदविली. या त्रुटी मनपाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे व व्यवस्थापन सुधारणे हा शुद्ध हेतू सर्वेक्षणामागे असल्याचे लीना बुद्धे यांनी सांगितले.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सदाेष
- ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण ही सध्यातरी माेठी समस्या आहे. कंपनीच्या यंत्रणेद्वारे कचरा गाेळा करण्याची व विल्हेवाट लावण्याची प्रक्रियाच सदाेष आहे.
- ८० टक्के लाेकांच्या म्हणण्यानुसार ते घरीच कचऱ्याचे वर्गीकरण करतात. मात्र गाेळा करणाऱ्यांद्वारे ताे एकत्रितच स्वीकारला जात असल्याचे ६७ टक्के लाेकांचे म्हणणे आहे.
- २२ टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत समाधानी. ६० टक्के काहीसे असमाधानी तर १८ टक्के पूर्ण असमाधानी हाेते.
- कचरा गाेळा करणाऱ्या वाहनातून ओला व सुका कचरा वेगवेगळा गाेळा हाेत नाही. झालाही तरी भांडेवाडीमध्ये ताे एकत्रितच टाकला जाताे, यावर ७१ टक्के लाेकांनी नाराजी व्यक्त केली.
- २३ टक्केंच्या मते दरराेज कचरा गाेळा हाेताे. २५ टक्केंच्या मते हाताळण्याची पद्धत चुकीची.
- झाेपडपट्ट्यांमधून नियमित कचरा गाेळा हाेत नसल्याचा संताप लाेकांमध्ये आहे. म्हणून ताे रस्त्यावर फेकावा लागताे व ढिगारे तयार हाेतात. कचरा गाेळा करणारेही अशा उकिरड्यावरच कचरा टाकत असल्याची अनेकांची तक्रार आहे.
- परिसर स्वच्छतेबाबत ७२ टक्के लाेक पूर्णपणे समाधानी नाहीत. हनुमाननगर, लकडगंज व गांधीबाग झाेनचे नागरिक फार असमाधानी आहेत. बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबत ८१ टक्के लाेक असमाधानी आहेत. गांधीबाग, मंगळवारी, लकडगंज, धरमपेठ व धंताेली झाेनमध्ये हा राेष अधिक आहे.
मनपा व कंपनीमध्ये संघर्ष
दाेन खाजगी कंत्राटदारांना कचरा गाेळा करण्याचे कंत्राट आहे. या कंत्राटदार कंपनीशी महापालिकेचा संघर्ष आहे. या कंत्राटदारांना कचऱ्याच्या वजनानुसार शुल्क अदा केले जात असल्याने ते वजन वाढविण्यासाठी ओला व सुका कचरा एकत्रित गाेळा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दगडाचेही वजन दाखविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कचरा गाेळा करण्याचे हे प्रारूप सदाेष असल्याने ते बदलण्याची मागणी जाेर धरत आहे.