लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबी देतानाच उत्तम प्रशासनाचे धडेही गिरविले. त्याचा परिणाम महिनाभरातच दिसून आला. एरवी मुख्यालय परिसरात भटकंती करणारे कर्मचारी आता खुर्चीवर असतात. बहुसंख्य विभागाची उपस्थिती ६० टक्केवरून थेट १०० टक्के झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आलेख अचानक वाढल्याने त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवार २८ जानेवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. तत्पूर्वी २३ जानेवारीला मनपा मुख्यालयात विविध विभागात उशिरा येणारे आणि अनुपस्थित राहणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांची सरासरी ४१ टक्के होती. अर्थात ५९-६० टक्के कर्मचारी उपस्थित राहत होते. आता ही उपस्थिती सरासरी ९६ टक्के झाली आहे.पदाची सूत्रे स्वीकारताच मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना सकाळी ९.३० वाजता कार्यालयात हजर राहून बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून हजेरी लावावी.असे निर्देश दिले होते. याचा सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांवर झाल्याचे उपस्थितीवरून दिसून येते. १४ फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य (दवाखाने), ग्रंथालय, समाजकल्याण, कर आकारणी विभाग, जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के होती. शिक्षण, प्रकाश, स्थावर, उद्यान, आरोग्य (स्वच्छता), एलबीटी, लोककर्म, स्लम, नगररचना या विभागामध्ये ९५ ते ९९ टक्के उपस्थिती आहे. अन्य विभागातीलही कर्मचाऱ्यांची उपस्थिती ९० टक्केवर असून ह्या उपस्थितीची सरासरी ९६ टक्के इतकी आहे. मागील १५ दिवसांत अशीच उपस्थिती असल्याने आयुक्तांचे कौतुक होत आहे.कार्यालयाबाहेर शुकशुकाटमहापालिका मुख्यालय परिसरात कार्यालयीन वेळेत कर्मचारी भटकंती करताना दिसत होते. समित्यांची बैठक असली की विभाग प्रमुख बैठकीला गेल्यानंतर कर्मचारी परिसरात भटकतांना दिसत होते. यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना संबंधित कर्मचारी आपल्या खुर्चीवर मिळत नसे. परंतु आता कार्यालयीन वेळेत मुख्यालय परिसरात सर्वत्र शुकशुकाट असतो. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीचा हा परिणाम असल्याची मनपात चर्चा आहे.
मनपा कर्मचारी खुर्चीवर; उपस्थिती १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:37 PM
. एरवी मुख्यालय परिसरात भटकंती करणारे कर्मचारी आता खुर्चीवर असतात. बहुसंख्य विभागाची उपस्थिती ६० टक्केवरून थेट १०० टक्के झाली आहे.
ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव : उपस्थिती आलेख महिनाभरातच वाढला