नागपूर : भाजपा नेते व माजी नगरसेवक ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांना सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने मंगळवारी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. आर. एस. पावसकर यांनी हा निर्णय दिला.
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे १९ मार्च २००४ रोजी नागपुरात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. सुरक्षेकरिता तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, मुन्ना यादव हे अजनी चौकामध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी फटाकेही आणले होते. परंतु, पोलीस हवालदार राजेंद्र सरोदे यांनी सुरक्षेच्या कारणावरून त्यांना फटाके फोडण्यास मनाई केली, तसेच सर्व फटाके ताब्यात घेतले. त्यामुळे यादव यांनी चिडून सरोदे यांना धक्काबुक्की केली व फटाके हिसकावून आतषबाजी केली. परिणामी, सरोदे यांनी यादव यांच्याविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर २९ मार्च २००४ रोजी यादव यांना अटक करण्यात आली होती. पुढे त्यांची जामिनावर सुटका झाली होती.