नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवात राडा करून स्कोअररला मारहाण करण्याच्या प्रकरणात भाजपनेते मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन या दोघांनाही अखेर पोलिसांनी अटक केली. मात्र, त्यानंतर काही वेळातच जामिनावर त्यांची सुटका झाली. या प्रकरणावरून राजकारण तापले आहे.
खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत छत्रपती नगर क्रिकेट मैदानावर गुरुवारी दुपारी एक वाजता एलेव्हन स्टार आणि खामला स्टार यांच्यात सामना सुरू होता. करण, अर्जुन व त्यांच्या साथीदारांनी थ्रो बॉलबाबत अम्पायरच्या निर्णयावर वाद घालण्यास सुरुवात केली. हे पाहून सामन्याचा स्कोअरर अमित होशिंगने करणला सामन्याच्या नियमांचा हवाला दिला. हे पाहून करणने अमितला शिवीगाळ करत, त्याच्यावर बॅटने हल्ला केला, याशिवाय त्यांनी तेथील पदाधिकाऱ्यांनाही धमकावले. हा प्रकार झाल्यावर अमितने शुक्रवारी दोनदा प्रतापनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा तो तेथून परतला.
अखेर वैद्यकीय तपासणी झाल्यावर शनिवारी सकाळी त्याने तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याची तक्रार घेत, दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला. मात्र, दोघांनाही अटक झाली नव्हती व त्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत होते. रविवारी रात्रीच्या सुमारास दोघांनाही पोलिसांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात बोलविले. दोघेही पोलिस ठाण्यात पोहोचले व पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, लगेच त्यांना जामीनही देण्यात आला. या प्रक्रियेला जेवढा वेळ लागला, तेवढाच काळ दोघेही पोलिस ठाण्यात होते. जामिनाची प्रक्रिया झाल्यावर दोघेही निघून गेले. एरवी एखाद्या आरोपीने लहानसा गुन्हा केला असेल, तरी पोलिस लगेच त्याला घरून ताब्यात घेतात. मग या दोघांना गुन्हा दाखल झाल्यावर इतकी सवलत का देण्यात आली व लगेच अटक का झाली नव्हती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.