नागपूर : महाराष्ट ईमारत व ईतर बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव आणि त्यांचे बंधू बाला यादव यांची शनिवारी सीआयडीने चौकशी केली.
अनेक गुन्ह्यात आरोपी असलेला सूरज लोलगे याचा सोनेगावातील एका कोट्यवधींच्या भूखंडाच्या मालकी हक्कावरून राहूल धोटे आणि मनिष गुडधे यांच्यासोबत वाद सुरू आहे. त्यात मध्यस्थी करून समेट घडविण्यासाठी आपण मुन्ना यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २२ लाख रुपये मागितले होते आणि दिले नाही म्हणून शिवीगाळ करून धमकी दिली, असा आरोप सूरज लोलगे याने पोलिसांकडे तक्रार करून लावला होता. पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करून नंतर लोलगेने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. अतूल चांदूरकर यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडीने करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार, सीआयडीच्या अधिका-यांनी यादव बंधूंना शनिवारी दुपारी कार्यालयात चौकशीसाठी बोलविले. तेथे या प्रकरणाची पार्श्वभूमी आणि त्यांच्यावर लागलेल्या आरोपाबाबत सीआयडीच्या अधिका-यांनी यादव बंधूंना विचारपूस करून चौकशी केली.
--
कोणत्याही चौकशीला तयार : मुन्ना यादव
या संदर्भात यादव यांची बाजू समजून घेण्यासाठी लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला असता मुन्ना यादव म्हणाले, लोलगेने लावलेले आरोपी खोटे आहेत. राजकीय सुडबुद्धीने आपल्यावर आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असेही यादव म्हणाले.
--