लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणारा उमेदवार मुन्नाभाई निघाला. त्याने नव्हे तर भलत्यानेच त्याच्या नावावर पेपर सोडविल्याचे स्पष्ट झाले अन् परीक्षा पास करवून देणारे एक आंतरराज्यीय रॅकेटच पोलिसांच्या हाती लागले. या रॅकेटमधील चार जणांना बजाजनगर पोलिसांनी नागपूर, औरंगाबाद आणि जालन्यातून अटक केल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
सहकार, पणन आणि वस्रोद्योग विभागातर्फे कनिष्ठ लिपिकासाठी निवेदन करणाऱ्या उमेदवारांची २३ फेब्रुवारी २०२०ला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत २०० पैकी १७८ गुण मिळवून नागपूरचा इंद्रजित केशव बोरकर हा उमेदवार टॉपर आला. ८९ टक्के गुण मिळवणाऱ्या बोरकरला नंतर कागदपत्र घेऊन बोलविण्यात आले. तेव्हा उत्तरपत्रिका, परीक्षा केंद्रावर करण्यात आलेली सही आणि सादर केलेल्या कागदपत्रांवरील सहीत तफावत आढळली. त्यामुळे परीक्षा नियंत्रक राजू दत्तू बिर्ले (वय ५१) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संशय आला. टॉपर आलेला उमेदवार समोरासमोर प्रश्नोत्तरात गडबडल्याचे बघून संशय गडद झाल्याने बिर्ले यांनी बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी १२ मार्च २०२०ला या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
इंद्रजितला पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता त्याने वडिलांच्या ओळखीच्या दिग्रस(जि. यवतमाळ)ला राहणाऱ्या हंसराज मोहन राठोड (वय ६२) या निवृत्त शिक्षकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने लेखी परीक्षा पास करून देण्याची हमी दिली. परीक्षा पास होऊन नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर साडेचार लाख रुपये देण्याचे ठरल्याचेही सांगितले. त्यामुळे पोलिसांनी इंद्रजितचे वडील केशव बोरकर, हंसराज राठोड आणि प्रेमसिंग रामसिंग राजपूत (रा. सिडको, औरंगाबाद) यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले. त्यावेळी बोरकर आणि राजपूतने अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर बोरकर, राठोड आणि राजपूतकडून पोलिसांना माहिती देण्याचे टाळले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बजाजनगरच्या द्वितीय निरीक्षक वर्षा देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परीक्षा कुणी दिली, हे शोधून काढण्यासाठी आतमधील सीसीटीव्ही तपासले. त्यात बोरकरच्या आसनक्रमांकावर भलताच व्यक्ती उत्तरपत्रिका सोडवत असल्याचे दिसले. तो कोण हे शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल्स काढले. त्यात १० क्रमांक संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्यापैकी प्रतापसिंग धोंडीराम दुल्हट (वय २५, रा. परदेसीवाडी खंडारी, बदनापूर, जि. जालना) आणि पूनमसिंग हरसिंग सुंदरडे (वय ३४, रा. औरंगाबाद) यांना चाैकशीसाठी ताब्यात घेण्याचे ठरवले.
एमपीएससीची तयारी केली अन्
पोलीस पथक २८ फेब्रुवारीला औरंगाबाद येथे पोहोचले तेव्हा आरोपी प्रतापसिंग दुल्हट आरोग्य विभागाची परीक्षा देण्यासाठी पुण्याकडे निघाला होता. धावत्या टॅक्सीला थांबवून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे त्यावेळी स्पाय कॅमेरा ॲप इन्स्टॉल असलेला मोबाइल, एक टॅब, मायक्रो इअर फोन (जो कानात आतपर्यंत) जातो आणि सहजासहजी लक्षात येत नाही तसेच सीमकार्ड जप्त केले. त्याला नागपुरात आणून १ मार्चला अटक करण्यात आली तर त्याच्या चौकशीतून ४ मार्चला पूनमसिंग सुंदरडे यालाही अटक करण्यात आली.
----
असा चालायची बनवाबनवी
या रॅकेटचे सूत्रधार आरोपी प्रेमसिंग राजपूत आणि प्रतापसिंग दुल्हट हे दोघे आहेत. आरोपी राजपूत हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सिडको, औरंगाबाद येथे लिपिक आहे, तर प्रतापसिंग हा अत्यंत हुशार असून, त्याने एमपीएससीची तयारी केली आहे. तो परीक्षार्थी म्हणून कुणाच्याही नावावर पेपर सोडवायला जायचा. शर्टाच्या खाली तो एक टी-शर्ट घालायचा. त्यात आतून एक खिसा ज्यात मोबाइल राहील आणि त्याचा केवळ कॅमेरा बाहेर येईल एवढे छिद्र असते. त्यातून स्वयंचलित मोबाइल कॅमेरा दर चार सेकंदाने प्रश्नपत्रिकांचे फोटो घ्यायचा अन् आपोआपच हे फोटो डिवाईसच्या माध्यमातून औरंगाबादला बसलेल्या राजपूत तसेच सुंदरडे या दोघांच्या टॅबवर जायचे. ते वाचून त्याचे उत्तर ते प्रतापसिंगला फोनवरून सांगायचे. प्रतापसिंगच्या कानात मायक्रोफोन असल्याने तो उत्तरे लिहून काढायचा.
----
रत्नागिरी, अकोल्यात गुन्हे दाखल
त्यांचा हा गोरखधंदा २०१६ पासून सुरू होता. यापूर्वी रत्नागिरी आणि अकोल्यातही त्यांच्यावर असे गुन्हे दाखल झाल्याचे उपायुक्त नुरूल यांनी सांगितले. या हायटेक रॅकेटचा अत्यंत शिताफीने शोध लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगरचे ठाणेदार महेश चव्हाण, द्वितीय निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या नेतृत्वात एएसआय सुरेश पाठक, संजय ठाकूर, हवलदार आवेश खान, गोविंदा बारापात्रे, नायक गाैतम रामटेके, अश्विन चाैधरी,अमित गिरडकर, सुरेश वरूडकर आणि वैभव यादव यांनी सलग दोन महिने परिश्रम घेतल्याचेही उपायुक्त नुरूल यांनी सांगितले.
---